पावसाने हुल दिल्याने पंपाचा आधार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

गुहागर - जून व जुलै महिन्यात पावसाने हुल दिल्याने उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीची कामे खोळंबली आहेत. ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याने लावणीसाठी रोप तयार असल्याने रॉकेल, डिझेल पंपाच्या साह्याने पाणी आणून लावणी उरकून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. या पंपांचा वापर वाढल्याने दुरुस्तीच्या कामे करणाऱ्या तंत्रज्ञांची शेताच्या बांधावर पळापळ सुरू आहे. 

यावर्षी पावसाचा लपंडाव सुरू आहे. दिवसभरातून येणाऱ्या मोठ्या पावसामुळे जूनअखेरीपासून सखल भागातील लावण्यांना सुरवात झाली. सखल भागातील शेतकऱ्यांच्या लावण्या पूर्ण झाल्या; मात्र डोंगर उतारावर शेती असलेला शेतकरी पावसाने ओढ दिल्याने अगतिक झाला आहे. रोज पडणारा पाऊस आणि लख्ख उन्हामुळे भाताची रोपे सुकू लागली आहेत. त्यामुळे उत्तर रत्नागिरीत ठिकठिकाणी सध्या शक्‍य असेल तेथून रॉकेल, डिझेल पंपाने पाणी उपलब्ध करून शेतकऱ्यांनी लावणी सुरू केली आहे.  पावसाळा सुरू झाल्यावर रॉकेल, डिझेल पंपाची आवश्‍यकता संपते. त्यामुळे या पंपाचे सुटे भाग सहज उपलब्ध होत नाहीत. लावणी लावतानाच पंप बंद पडला तर तत्काळ दुरुस्तीची कामे करणाऱ्या तंत्रज्ञांची दमछाक होत आहे. आडगावात पंप बंद पडला तर जवळच्या शहरात जाऊन सुटे भाग आणून दुरुस्तीची कामे सुरू आहेत.  

‘‘पावसाने ओढ दिल्याने शेतकरी रॉकेल व डिझेल पंपाचा वापर करून मिळेल तिथून पाणी घेत आहेत. त्यामुळे सध्या पंप दुरुस्तीची कामे वाढली आहेत. शेतात माणसे असताना पंप बिघडल्यास दुरुस्तीचे काम तत्काळ व्हावे अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे थेट शेतात जाऊन ही कामे करावी लागत आहेत.’’ 
- मकरंद काटदरे, शीर

Web Title: konkan news rain weather