हापूसला प्रतिडझन दोन हजार दर 

राजेश कळंबटे
गुरुवार, 25 जानेवारी 2018

रत्नागिरी - वातावरणाच्या तडाख्यातून वाचलेला रत्नागिरी हापूस हळूहळू वाशी मार्केटमध्ये दाखल होऊ लागला आहे. दांडेआडोम येथील कुमार चाळके यांच्या सात पेट्या वाशीत पाठविल्या असून येत्या काही दिवसांत चाळीस पेट्या जातील, असा अंदाज आहे. वाशी बाजारात दाखल होणाऱ्या पहिल्या हापूसला पेटीला दोन हजार रुपये दर मिळाला. 

रत्नागिरी - वातावरणाच्या तडाख्यातून वाचलेला रत्नागिरी हापूस हळूहळू वाशी मार्केटमध्ये दाखल होऊ लागला आहे. दांडेआडोम येथील कुमार चाळके यांच्या सात पेट्या वाशीत पाठविल्या असून येत्या काही दिवसांत चाळीस पेट्या जातील, असा अंदाज आहे. वाशी बाजारात दाखल होणाऱ्या पहिल्या हापूसला पेटीला दोन हजार रुपये दर मिळाला. 

पावसाळा हंगाम लवकर संपुष्टात आल्यानंतर हापूसला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा होती; परंतु दिवाळीनंतर आलेल्या ओखी वादळाने आंबा बागायतदारांची तारांबळ उडाली. वादळामुळे मोहोरावर बुरशी येण्याची भीती होती. दांडेआडोम येथील बागायतदार कुमार चाळके यांनी आपल्या बागेवर नजर ठेवत बुरशीजन्य रोगांपासून मोहोर वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वेळेत औषध फवारणी करीत पुढील दोन महिने झाडांची जपणूक केली. वेळेत औषधे आणि काळजी घेतल्याने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्याचे फळ चाळके यांना मिळाले. गेली अनेक वर्षे आंबा व्यवसायात असलेल्या चाळके मार्चमध्ये आंबे वाशी मार्केटला पाठवतात. यावर्षी त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे फेब्रुवारीच्या पहिल्या टप्प्यातील पीक मिळवता आले. 

थंडीचा कडाका अधिक काळ राहिल्यामुळे रिफ्लॉवरिंगचे संकट बागायतदारांपुढे आ वासून आहे. पहिल्या टप्प्यातील पीक ओखीने पळविले, तर आता पुन्हा मोहोर येऊ लागल्याने फळ गळ वाढू लागली आहे. या परिस्थितीचा सामना करणाऱ्या चाळके यांना पहिल्या टप्प्यातील उत्पादन काही प्रमाणात मिळविण्यात यश आले आहे. ऑक्‍टोबरला आलेल्या पहिल्या टप्प्यातील मोहोराचा फायदा बागायतदारांना किफायतशीर मोबदला मिळवून देणार आहे. 

दरम्यान, वाशी बाजारात आतापर्यंत दाखल झालेल्या रत्नागिरी व देवगडच्या हापूसला दरही चांगला मिळाल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या आंब्याला किलोला 460 रुपये दर मिळाला आला. पेटीला नऊ ते साडेनऊ हजार रुपये दर मिळाला आहे. यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे वाशीत पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, देवगडमधून जाणाऱ्या पेट्यांचा ओघ कमीच आहे. त्यामुळे सुरुवातीला बागायतदारांना चांगला दर मिळेल अशी शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. 

""दिवाळीत पडलेल्या पावसानंतर वेळेत औषध फवारणी केल्यामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर वाचविणे शक्‍य झाले. मेहनत आणि योग यामुळेच पीक हाती लागले.'' 
- कुमार चाळके, दांडेआडोम 

पारंपरिक व्यावसायिक 
कुमार चाळके पारंपरिक आंबा व्यावसायिक आहेत. त्यांचे वडील 1985 पासून हा व्यवसाय करत आहेत. वाणिज्य शाखेची पदवी घेतलेले चाळके 1993 व्यवसायात आले. विविध स्थित्यंतरांचा अनुभव घेत त्यांनी व्यवसाय सुरू ठेवला आहे.

Web Title: konkan news ratnagiri hapus mango