रेल्वे तिकीट तपासनीस फैलावर; सेना आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - मुंबईतील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करत रत्नागिरीत पोचलेल्या प्रवाशाला रत्नागिरी रेल्वे स्थानकावर तिकीट तपासनीसांकडून दुजाभावाची वागणूक मिळाल्याने शिवसेना आक्रमक झाली. कारवाई करताना प्रवाशांच्या अडचणी जाणून घ्या, असा इशारा माजी शहरप्रमुख प्रमोद शेरेंसह नगरसेवक सुहेल मुकादम यांनी रेल्वे  प्रशासनाला दिला.

रत्नागिरी - मुंबईतील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करत रत्नागिरीत पोचलेल्या प्रवाशाला रत्नागिरी रेल्वे स्थानकावर तिकीट तपासनीसांकडून दुजाभावाची वागणूक मिळाल्याने शिवसेना आक्रमक झाली. कारवाई करताना प्रवाशांच्या अडचणी जाणून घ्या, असा इशारा माजी शहरप्रमुख प्रमोद शेरेंसह नगरसेवक सुहेल मुकादम यांनी रेल्वे  प्रशासनाला दिला.

मंगळवारी (ता. २९) दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने अवघी मुंबापुरी तुंबापुरी झाली. रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. त्याचा फटका कोकण रेल्वेला बसला. रत्नागिरीतील प्रवासी मिळेल त्या गाडीने परतण्याच्या गडबडीत आहेत. या धावपळीत अनेकांना तिकिटेही मिळालेली नाहीत. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीत स्थानकात दाखल झालेल्या एका गाडीतून काही प्रवासी उतरले. त्यातील एका तरुणाकडे तिकीट नव्हते. त्याला तिकीट तपासनीसाने पकडले. त्या मुलाने परिस्थितीची जाणीव करून दिली. परंतु त्याला दिलासा देण्यापेक्षा तिकीट तपासनीसाने दरडावण्यास सुरुवात केली. त्याचा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्नही केला.

हा प्रकार समजल्यानंतर शिवसेना नगरसेवक सुहेल मुकादम, माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे यांच्यासह शिवसैनिक रेल्वेस्थानकावर दाखल झाले. त्यांनी स्थानकप्रमुख कोवे यांची भेट घेतली. शेरे यांनी परिस्थितीची माहिती दिली आणि अशा प्रवाशांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या ही विनंती केली. कोवे यांनीही योग्य त्या सूचना तिकिट तपासणीसांना दिल्या; मात्र तपासनीसांनी लेखी माहिती द्या असे सांगितले. तेव्हा शेरे संतापले. त्यांनी टीसीलाही इशारा देत कारवाई करुन दाखवा आम्ही शिवसेनेची स्टाईल दाखवू, असा इशारा दिला. त्यानंतर स्टेशनमास्तर यांनी हस्तक्षेप केला. विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांच्याशी शिवसैनिकांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला व प्रवाशांवर कारवाई करू नका, अशी विनंती केली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी शहरप्रमुख बिपिन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख नगरसेवक संजू साळवी, दादा कदम, साकिब मुकादम, अमित मराठे, असीम काझी, अरफात वाडेकर, अंकित साळवी आदी उपस्थित होते.

मुंबईतील आपत्तीत अडकलेल्यांना मदत करण्यासाठी सर्वचजणं पूढे सरसावले आहेत. मात्र रत्नागिरीत विरोधी चित्र पाहायला मिळाले. तिकीट तपासनिसाकडून रेल्वेस्थानकावर सहानुभूतीही मिळाली नाही.
- सुहेल मुकादम, नगरसेवक

Web Title: konkan news ratnagiri railway