संगमेश्वरमध्ये महिनाभरात सलग दुसरा बिबट्या मृतावस्थेत

संदेश सप्रे 
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

काही वेळातच बिबट्याने मान टाकली आणि तो जागीच गतप्राण झाला. यानंतर वन कर्मचारी यांनी त्याची पाहणी केली असता त्याच्या पायाला मोठी जखम झाल्याचे दिसून आले.

देवरुख, (रत्नागिरी) :  संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथे जखमी झालेल्या बिबट्या मृतावस्थेत सापडला आहे. या महिन्यात सलग दुसरा बिबट्या मृतावस्थेत सापडण्याची घटना घडली असून गेल्या दोन महिन्यात तालुक्यात सापडलेला हा चौथा बिबट्या आहे.

मारळ डांगेवाडीतील ग्रामस्थ पांडुरंग सुर्या परसराम यांना आज सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घराशेजारीच बिबट्या ओरडत असल्याचे दिसून आले. त्यांनी पाहणी केली असता एक बिबट्या जखमी अवस्थेत विव्हळत पडला असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ याची खबर पोलिस पाटील देवदास सावंत यांना दिली. पोलिस पाटील यांनी घटनेची खातरजमा करीत याची माहिती वनविभागाला दिली. 

यानंतर वनपाल विलास मुळ्ये यांच्यासह वनरक्षक दिलिप आरेकर , सागर गोसावी यांनी  घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. काही वेळातच बिबट्याने मान टाकली आणि तो जागीच गतप्राण झाला. यानंतर वन कर्मचारी यांनी त्याची पाहणी केली असता त्याच्या पायाला मोठी जखम झाल्याचे दिसून आले. ही जखम जुनी असल्याने त्यातून विषबाधा होत बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला.

मृत बिबट्याला ताब्यात घेत तात्काळ पंचायत समिती आवारतील पशु संवर्धन विभागात आणण्यात आले. येथे डॉक्टर नागले यांनी त्याचे विच्छेदन केले. यामध्ये पायाला गॅंगरिन झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. 
उपस्थित अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सापडलेला बिबट्या नर असून पूर्ण वाढ झालेला १० ते १२ वर्शांचा होता असे सांगण्यात आले.

तालुक्यात गेल्या ३ महिन्यात बिबट्या सापडण्याची ही चौथी घटना आहे. जुन महिन्यात आंबा घाटात बिबट्या सापडला त्याला सुरक्षित स्थळी सोडण्यात आले. त्यानंतर गेल्या महिन्यात साखरपा गुरववाडी मधे फासकित अडकलेल्या बिबट्याला जिवदान देण्यात आले. या महिन्यात निवे खुर्द येथे २३ ऑगस्ट रोजी शेणखइत बिबट्या मृतावस्थेत सापडला होता. तर आजचा मारळ मधील जिवंत बिबट्या जागेवरच मयत झाला.

Web Title: konkan news sangameshwar leopard found dead