संजय गांधी योजना मोडेमविना ‘निराधार’ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

गुहागर - येथील टपाल कार्यालयातील कामकाज गेले २५ दिवस कासवगतीने सुरू आहे. दुरुस्तीला पाठविलेला मोडेम आजपर्यंत कार्यालयाला मिळालेला नाही; मात्र इंटरनेटची कनेक्‍टिव्हिटी नसल्याने कामकाज बंद आहे, असे ग्राहकांना सांगितले जात आहे. संजय गांधी निराधार योजनेची शासनाकडून दर महिन्याला मिळणारी रक्कमही यामुळे ग्रामीण शाखांना देता आलेली नाही.

गुहागर - येथील टपाल कार्यालयातील कामकाज गेले २५ दिवस कासवगतीने सुरू आहे. दुरुस्तीला पाठविलेला मोडेम आजपर्यंत कार्यालयाला मिळालेला नाही; मात्र इंटरनेटची कनेक्‍टिव्हिटी नसल्याने कामकाज बंद आहे, असे ग्राहकांना सांगितले जात आहे. संजय गांधी निराधार योजनेची शासनाकडून दर महिन्याला मिळणारी रक्कमही यामुळे ग्रामीण शाखांना देता आलेली नाही.

गुहागर टपाल कार्यालयात वापरण्यात येणारा मोडेम ८ जूनपासून बंद पडला. गुहागरच्या पोस्टमास्तरनी याची माहिती तत्काळ वरिष्ठ कार्यालयाला दिली; मात्र पोस्टातील तंत्रज्ञ आठ दिवसांनी १५ जूनला मोडेम दुरुस्तीसाठी आला. या तंत्रज्ञाने नादुरुस्त झालेला मोडेम ताब्यात घेतला. दोन दिवसांत दुरुस्त केलेला मोडेम पाठवून देतो असे सांगितले. महिना लोटला तरी मोडेम आलेला नाही. ना पर्यायी दिला. मोडेम नसल्याने सध्या लेन २ या एकाच लाईनवरून पोस्टाचा सर्व व्यवहार सुरू आहे. त्यामुळे बचत खात्यातील व्यवहार, बिल भरणा, स्पीड पोस्ट आदी कामे कासवगतीने सुरू आहेत. त्यातच इंटरनेट गेले, तर अर्धवट स्थितीत काम झालेल्या खातेदाराला काम पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते. रांगेतील ग्राहकांना काम न होताच माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे पोस्टाचे ग्राहक वैतागले आहेत. पोस्टातील कर्मचाऱ्यांना रोज ग्राहकांच्या संतापाला तोंड द्यावे लागत आहे. 

गुहागर टपाल कार्यालयाला उपडाकघराचा दर्जा आहे. तालुक्‍यातील आरेगांव, असगोली, धोपावे, पालशेत, वरवेली, वेलदूर, कोतळूक, पिंपर व जामसूद या नऊ ग्रामीण डाकशाखांचे काम गुहागरमधून चालते. 

संजय गांधी निराधार योजनेची शासनाकडून दर महिन्याला मिळणारी रक्कम गुहागरमधून या नऊ ग्रामीण शाखांना दिली जाते. या रकमेचा धनादेश गुहागर कार्यालयात आला; मात्र मोडेम बंद असल्याने ९ शाखांमधील ७६५ खातेदारांना ही रक्कम मिळालेली नाही. किसान विकास, आठवी मालिका, मासिकप्राप्ती, मुदत ठेव, बचत खाती यांची कामे करण्यासाठी अधिकारी कर्मचारी रात्रपाळी करत आहेत. अधिक काम असल्यास शृंगारतळी येथील टपाल कार्यालयात जाऊन कामाचा निपटारा केला जात आहे. त्यामुळे सदर मोडेमेचे काम युद्धपातळीवर करावे अथवा गुहागर टपाल कार्यालयाला पर्यायी मोडेम द्यावा, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.

Web Title: konkan news Sanjay Gandhi scheme