गोव्यास जोडणाऱ्या सातार्डा पुलास धोका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

सावंतवाडी - गोवा आणि महाराष्ट्र अशा दोन राज्यांना जोडणाऱ्या सातार्डा पुलाखालचा किनाऱ्याचा भाग खचल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. परिसरातील पाचशे मीटरची जमीन पाण्याखाली गेली आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. परिसरात चुकीच्या पद्धतीने वाळू उत्खनन केले जात असल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप ग्रामस्थांतर्फे करण्यात आला. धोका टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

सातार्डा गावाच्या सीमेवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उभारलेला पूल आहे. या ठिकाणी आणि परिसरात गोवा आणि महाराष्ट्र सीमेवर राहणारे अनेक व्यावसायिक वाळू उत्खननाचा व्यवसाय करतात. यामुळे पुलाच्या सुरक्षेचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून आहे. याबाबत अनेक तक्रारीही आहेत.

गेले दोन ते तीन दिवस झालेल्या पावसामुळे पुलाच्या भागाला असलेल्या तेरेखोल खाडीचा सुमारे पाचशे मीटर भाग पाण्यात गेला. या ठिकाणी आपसूकच नदीपात्राची रुंदी वाढली आहे. अचानक हा प्रकार घडल्यामुळे परिसरात असलेल्या शेतकऱ्यांची जमीन नदीने गिळंकृत केली आहे. बाजूला असलेल्या घरांनासुध्दा भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

याबाबतची माहिती तेथील ग्रामस्थांनी ‘सकाळ’ला दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार गेली अनेक वर्षे चुकीच्या पद्धतीने तेरेखोल खाडीपात्रात उत्खनन सुरू आहे. यामुळे नदीचे कठडे ढासळून बाजूला असलेले क्षेत्र पाण्याखाली जाण्याचा प्रकार वाढला. आमची शेती पाण्याखाली गेल्याने आता भविष्यात खायचे काय? असा प्रश्‍न गावकऱ्यांकडून विचारला जात आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर नदीचे पात्र रुंदावून किनाऱ्यावर असलेल्या घरांना धोका निर्माण होणार आहे. पुलालाही धोका निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकाराची चौकशी करण्यात 

यावी तसेच पुलाच्या परिसरात सुरू असलेले अनधिकृत वाळू उत्खनन रोखण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

तहसीलदारांची धाव
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर येथील तहसीलदार सतीश कदम यांनी पुलाच्या पाहणीसाठी घटनास्थळी धाव घेतली. याबाबतची माहिती त्यांनी दिली. आपण या प्रकाराची गंभीर दखल घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुलाच्या बाजूला असलेला नदीचा कठडा कोसळला आहे. त्याचा शासकीय विभाग आपल्याकडे येत नाही; मात्र ज्या ठिकाणी भाग कोसळला, त्याचा आणि पुलाचा थेट संबंध दिसत नाही. या प्रकाराची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- सुरेश बच्चे पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, सावंतवाडी

Web Title: konkan news sawantwadi rain