वातानुकूलित ‘शिवशाही’ बसचा शाही थाट बिघाडामुळे उतरला!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

रत्नागिरी - एसटी महामंडळाने सुरू केलेल्या वातानुकूलित ‘शिवशाही’ एसटीचा शाही तोरा बिघाडामुळे उतरला. पनवेल येथे बंद पडल्यानंतर सोमवारी (ता. १२) रात्री मुंबईची वारी करण्यासाठी निघालेली शिवशाही खेडशी येथे रात्री साडेअकरा वाजता बंद पडली. त्यानंतर पर्यायी गाडी देण्यासाठी विलंब झाल्याने प्रवासी संतापले. काल सकाळी दहापर्यंत हे प्रवासी मुंबईत पोचले नव्हते. 

रत्नागिरी - एसटी महामंडळाने सुरू केलेल्या वातानुकूलित ‘शिवशाही’ एसटीचा शाही तोरा बिघाडामुळे उतरला. पनवेल येथे बंद पडल्यानंतर सोमवारी (ता. १२) रात्री मुंबईची वारी करण्यासाठी निघालेली शिवशाही खेडशी येथे रात्री साडेअकरा वाजता बंद पडली. त्यानंतर पर्यायी गाडी देण्यासाठी विलंब झाल्याने प्रवासी संतापले. काल सकाळी दहापर्यंत हे प्रवासी मुंबईत पोचले नव्हते. 

शिवशाही ही आलिशान गाडी रत्नागिरी एसटी विभागात दाखल झाली. मोठ्या थाटात या एसटीचे स्वागत करण्यात आले. शिवशाहीचा प्रवास सुरू झाला आणि दुसऱ्याच दिवशी प्रवासाला अडसर आला तो गाडीच्या बिघाडाचा. मुंबईतून सुटल्यानंतर ११ ला रात्री पनवेल येथे तांत्रिक बिघाडामुळे ही बस बंद पडली. वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यामुळे तेथून प्रवाशांना दुसऱ्या निमआराम बसने रत्नागिरीत आणण्याची व्यवस्था करावी लागली. या प्रकाराचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास देण्यात आला. त्यानंतर तरी शिवशाहीचा प्रवास सुखकर होईल, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. 

शिवशाहीच्या तिसऱ्या दिवशीच्या प्रवासात पुन्हा माशी शिंकली आणि काल रात्री उशिरा सोडण्यात आलेली शिवशाही गाडी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास खेडशीत बंद पडली. गाडीमध्ये साधारण ४० प्रवासी होती. गाडी बंद पडल्यामुळे महामंडळाला प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात विलंब झाला. गाडी उशिरा आल्याने अनेक प्रवासी भडकले होते. महामंडळाच्या व्यवस्थेबाबत बोटे मोडत होते. दुसऱ्या दिवशी मुंबईत लवकर पोचून अनेकांनी काही नियोजन केले होते. परंतु या सर्व प्रकारामुळे त्याचे वेळापत्रकच बिघडले. या प्रकाराची गंभीर दखल महामंडळाने घेतली आहे. अशोक लेलॅंड कंपनीची टीम येथे दाखल झाली असून गाडीला पिकअप मिळत नसल्याचा तांत्रिक बिघड झाला आहे. लवकरच ती दुरुस्त होईल, असे विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले. 

कंपनीला देणार मेमो
याबाबत एसटी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के म्हणाल्या, ‘‘शिवशाहीची गाडी काल रात्री पुन्हा बंद पडली. भारमान वाढावे, यासाठी आम्ही हा प्रयोग केला होता. मुंबई येथील रॅम्बो कंपनीने एसटी महामंडळाशी करार केला आहे. आम्हाला दिलेली गाडी वारंवार बिघडत असलल्याने वरिष्ठ कार्यालयाला अहवाल देऊन कंपनीला मेमो काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. भविष्यात अशी घटना घडल्यास पर्यायी गाडी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.’’

Web Title: konkan news shiv shai bus