टंचाई आराखड्यातील गावे तहानलेलीच

टंचाई आराखड्यातील गावे तहानलेलीच

सिंधुदुर्गनगरी - पाणीटंचाई कामांच्या निविदा प्रक्रियेला मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे आणि कागदपत्र पूर्ततेत होत असलेल्या दिरंगाईमुळे कामांना मंजुरी मिळूनही पाणीटंचाईची कामे लांबणीवर पडली आहेत. पाणीटंचाईच्या मंजूर २१८ कामांपैकी केवळ ७४ कामे आतापर्यंत पूर्ण झाली असून, ७० कामे सुरू आहेत, तर ३२ कामांच्या ई-निविदा प्रक्रियेला अल्प प्रतिसाद लाभल्याने ही कामे रेंगाळली आहेत.

जिल्ह्यात दरवर्षी कोट्यवधीचा टंचाई आराखडा अहवाल बनविला जातो, मात्र वेळेत कामे पूर्ण होत नसल्याने टंचाईवर मुळापासून उपाय करण्यात मर्यादा येतात. यंदाही तिच स्थिती झाली आहे. टंचाई निवारण आराखड्यातील अवघी ७४ कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले.

यंदा जिल्ह्याचा ५ गावे आणि २९२ वाड्यांचा ४ कोटी ९९ लाखाचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्याला प्रशासनाने मंजुरीही दिली होती. प्रस्तावित आराखड्यापैकी २६४ कामांचे सर्वेक्षण होऊन २२२ कामांची अंदाजपत्रके सादर केली होती. त्यापैकी २१८ कामांना प्रशासकीय मान्यता मिळून एकूण १४४ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यापैकी आजपर्यंत ७४ कामे पूर्ण असून ७० कामे प्रगतीपथावर (सुरू) आहेत. ३८ कामे पुरेसे पाणी उपलब्ध होणार नाही या कारणास्तव रद्द करण्यात आली आहेत.

जिल्ह्यात ५ गावे व २९२ वाड्यांचा ४ कोटी ९९ लाखाचा प्रस्तावित पाणी टंचाई आराखडा होता. त्यामध्ये ५३ विंधनविहीर, ४२ विंधन विहीर दुरुस्ती, ८९ विहीर खोल करणे-गाळ काढणे, ८३ नळपाणी पुरवठा दुरुस्ती तर ३० तात्पुरत्या पुरक नळपाणी योजनांचा समावेश करण्यात आला होता. जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यामध्ये काही गावात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागला. या कालावधीत जिल्ह्यात विंधन विहीरी २८, विंधन विहीर दुरुस्ती ३०, विहीर खोल करणे १३, नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती अशी एकूण ७४ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

३० जूनपर्यंत कामांना मर्यादा
पाणीटंचाई कामांना ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे; मात्र जिल्ह्यात पाऊस सुरू झाला आहे. पाऊस सक्रिय होऊन पाणीटंचाईचा प्रश्‍न मिटल्यास यावर्षीही पाणीटंचाईची कामे थांबविली जाणार आहेत, तर काही कामांना रस्ता आणि दलदल यामुळे अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे यावर्षीही पाणीटंचाई आराखड्यातील कामे अर्धवटच राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

निविदेत घोळ
पाणीटंचाई आराखड्यातील नळपाणीपुरवठा दुरुस्ती २२ कामे व तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठ्याची १० कामे अद्यापही इ निविदा प्रक्रियेत अडकली आहेत. या कामांच्या निविदा प्रक्रियेला अल्प प्रतिसाद लाभल्यामुळे पाणीटंचाईची कामे रखडली आहेत, तर प्रशासनाकडून कामाना मंजुरी मिळाली असली तरी जमिनीच्या बक्षीसपत्रासह कागदपत्राची पूर्तता वेळीच झाली नसल्याने पाणीटंचाईची कामे रेंगाळली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com