‘सोलनपाडा’ ओव्हरफ्लो

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

नेरळ - कर्जत तालुक्‍यातील सोलनपाडा धरण रविवारपासून (ता. २) ओसंडून वाहू लागले आहे. गेल्याच वर्षी प्रसिद्ध झालेले हे धरण भरल्यानंतर सांडव्यामधून बाहेर पडणाऱ्या पाण्यात हजारो पर्यटकांनी वर्षा सहलीचा आनंद लुटला.

नेरळ - कर्जत तालुक्‍यातील सोलनपाडा धरण रविवारपासून (ता. २) ओसंडून वाहू लागले आहे. गेल्याच वर्षी प्रसिद्ध झालेले हे धरण भरल्यानंतर सांडव्यामधून बाहेर पडणाऱ्या पाण्यात हजारो पर्यटकांनी वर्षा सहलीचा आनंद लुटला.

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे खात्याने बांधलेल्या जामरूख सोलनपाडा येथील पाझर तलावाची दुरुस्ती करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी ही दुरुस्ती करण्यात आल्यानंतर सांडवा नव्याने बांधण्यात आला. धरण भरल्यानंतर अतिरिक्त पाणी सांडव्यातून बाहेर पडते. त्या ठिकाणी भिजण्याचा आनंद घेण्यासाठी गेल्या वर्षी पर्यटक आले होते. त्या वेळी एकाचा मृत्यूही झाला होता. यंदा पावसाळा सुरू होताच सोशल मीडियावर धरणाचे फोटो व्हायरल होत होते. मागील रविवारपर्यंत झुंडीने येणाऱ्या पर्यटकांचा पाणी नसल्याने हिरमोड झाला होता; परंतु मागील चार दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने धरण रविवारी पूर्ण भरले. शनिवारी १ जुलैपर्यंत धरणात जेमतेम पाणीसाठा होता. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने सकाळीच पाझर तलाव भरला आणि ११ च्या सुमारास सांडव्यातून विसर्ग सुरू झाला. हजारो पर्यटक आले. परिणामी सोलनपाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. आंबिवलीपासून सोलनपाडा गावापर्यंत म्हणजे आठ किलोमीटर परिसरात दुपारपासून वाहतूक कोंडी झाली. या भागातील नागरिकांनी हा अनुभव पहिल्यांदाच घेतला.

सोलनपाडा ग्रामस्थ आणि टेंबरे ग्रामपंचायतीने वाहतूक कोंडी दूर करण्याची काळजी घेतली. पर्यटकांनी मद्यपान करू नये, यासाठी जामरूख गावातच पोलिस वाहनांची तपासणी करीत होते. हे धरण भरून वाहू लागल्याने पुढील काळात या भागातील लोकांना दररोजच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागेल. हे लक्षात घेता पोलिस प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामस्थ मंगेश सावंत यांनी केले.

सातत्याने अपघाताच्या घटना घडत असल्याने जिल्हा प्रशासनाने गतवर्षी सोलनपाडा पाझर तलावावर पर्यटकांना बंदी घातली होती. या वेळी आमच्यापर्यंत कोणताही बंदी आदेश आणि सूचना आली नाही. तरीही धरण वाहू लागल्याने पर्यटकांना आम्ही मुख्य जलाशयात उतरू नये, अशा सूचना देत आहोत.
- श्रीमती मदगे, पोलिस पाटील.

Web Title: konkan news solanpada dam