तुळशी गावात तिलापिया जातीची मत्स्यशेती

सचिन माळी
गुरुवार, 22 जून 2017

समीर पारधींचा प्रयोग - शेतकऱ्यांना प्रेरणादायी; शेततळ्यात ५५० पिल्ले सोडणार
मंडणगड - पारंपरिक शेती सध्या अधिक कष्टप्रद व न परवडणारी झाल्याने आधुनिक शेतीची कास धरणाऱ्या तुळशी गावातील प्रगतिशील शेतकरी समीर पारधी यांनी शेतीस पूरक व्यवसाय म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्यपालन सुरू केले आहे. ‘तिलापिया’ जातीच्या माशांची पैदास करून वर्षाला दोन लाखांचे उत्पन्न घेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. तुळशी धरण पाणलोट क्षेत्रात शेतीत कृतिशील प्रयोग करणारे पारधी कुटुंब तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

पारंपरिक पिके आणि पद्धतीमुळे शेती तोट्याची ठरत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देऊन त्यांनी आधुनिक शेतीची कास धरली. गतवर्षी सगुणा पद्धतीने भात लागवड करून विक्रमी उत्पन्न घेतले. त्याच ठिकाणी नंतर कलिंगडाची लागवड करून भरघोस पीक घेतले. शेतीपूरक व्यवसायाकडे वळलेल्या पारधी यांनी वडील रामचंद्र पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली आपला लहान भाऊ संदेश पारधी यांना सोबतीला घेत कलिंगड व भाजी विक्रीचा व्यवसाय केला. त्यात त्यांना आर्थिक लाभ झाला. पारधी आता मत्स्यशेतीकडे वळले आहेत. त्यासाठी त्यांना कृषी सहायक अधिकारी राहुल देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले. 

विश्राम शिगवण यांच्या शेतात महाराष्ट्र शासनाच्या शेततळे योजनेतून त्यांनी २५ बाय २५ मीटरचे शेततळे तयार केले. तळ्याची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी शासकीय अनुदानासह स्वत:कडील ९० हजार रक्कम खर्च केले. या तळ्यात त्यांनी तिलापिया जातीच्या माशांची ५५० पिल्ले सोडली आहेत. सहा महिन्यांनंतर त्यांची वाढ पूर्ण होईल. या माशाला बाजारात १५० ते २०० रुपये किलोचा दर आहे. 

शेततळ्यात शेवाळ निर्माण व्हावे म्हणून ओले शेण टाकण्यात आले आहे. या माशांची प्रजनन क्षमता वाढत असल्याने पाण्यात नवीन अंडीपुंज किंवा पिलू सोडण्याची गरज राहणार नाही.

आणखी १० शेतकऱ्यांना प्रेरणा
मत्स्यपालनाचा हा व्यवसाय दीर्घकाळ चालणारा आणि फायदेशीर ठरणारा आहे. विविध शेतीपूरक व्यवसायातून प्रगती साधणाऱ्या पारधी यांच्या या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी तालुक्‍यातून अनेक शेतकरी तुळशी येथे येत असतात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आणखी दहा शेतकरी मत्स्यशेती करणार आहेत.

‘‘मत्स्य व्यवसायात सतत भांडवल गुंतवण्याची गरज नसते. तसेच पाण्याचा अपव्यय होत नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करता येत असल्याने पहिला प्रयोग केला आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास तालुक्‍यातील शेतकऱ्यांनाही हा व्यवसाय प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.’’
- समीर पारधी, तुळशी

Web Title: konkan news tilapia fish agriculture in tulashi village