तुळशी गावाला पर्यटनदृष्ट्या विकासाची संधी

तुळशी गावाला पर्यटनदृष्ट्या विकासाची संधी

मंडणगड - पंढरपूर-बाणकोट राज्य महामार्गावर मंडणगड शहरापासून सहा किलोमीटरच्या अंतरावर असणारी निसर्गसंपन्न तुळशी गावाच्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना खुणावू लागली आहेत. बारमाही धबधबे, रस्त्यालगतच असणारे विस्तीर्ण तुळशी धरण, गावातील प्राचीन मंदिरे, मनमोहक डोंगर, वनराई, येथील सांस्कृतिक परंपरा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू पाहात आहेत. या स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे. तसे झाल्यास तुळशी गाव पर्यटनाच्या नकाशावर येऊ शकते.

डॉ. आंबेडकरांचे मूळगाव आंबडवे या गावापासून जवळच आहे. वेळास, बाणकोटमार्गे हरेश्वर येथे जाणारा पर्यटक याच मार्गाने जातो. या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झालेला नाही. 

तुळशी गावात बारमाही पर्यटन होते.  विस्तीर्ण धरणाचे पात्र, बेलीचा पलन येथे दोनशे फुटांवरून बारमाही कोसळणारा धबधबा आणि तलाव येथील केंद्रबिंदू आहे. त्यालगतच प्राचीन पांडवकालीन गुहा आहे. या गुहेतील वातावरण अतिशय थंड आहे. माणूस उभा राहू शकेल एवढी उंची आहे. इलंवडी येथून भारजा नदीचे विस्तीर्ण पात्र वाहते. तसेच कातळशिल्प दिसून येतात. पर्यटनासाठी सोयी-सुविधांचा पाठपुरावा केल्यास येथे पर्यटन बहरू शकते. 

गावाच्या माथ्यावर देव रहाटीत वसलेले भैरवनाथाचे मंदिर भव्य आकारात नव्याने साकार होत आहे. तसेच गणपती, विठ्ठल रखुमाई, हनुमान, मरुआई, राधाकृष्ण छोटी मंदिरेही गावात आहेत. येथे वर्षभर भाविकांची ये-जा असते. गावात जत्रोत्सव व शिमागोत्सवाला गर्दीचे स्वरूप येते. ग्रामदैवतेच्या जत्रेसाठी तालुक्‍याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. कृषी पर्यटनाला येथे वाव असून, मत्स्यशेतीच्या माध्यमातून त्याची नांदी झाली आहे. 

वन्य अभ्यासकांच्या नजरेतही हा परिसर दुर्लक्षितच राहिला आहे. या सर्वांचा एकत्रित विचार करता निसर्गरम्य परिसर, जंगल, पशुपक्षी, कीटक यांच्या अस्तित्वामुळे येथे पर्यटनदृष्ट्या विकासाला चांगला वाव आहे. त्यासाठी येथील ग्रामस्थही तयार आहेत. 

गावाला पर्यटनाचा दर्जा मिळावा यासाठी ग्रामपंचायतीमार्फत ठराव घेऊन शासनाला सादर केला आहे. तुळशी पर्यटनाच्या नकाशावर झळकल्यास खऱ्याअर्थाने आर्थिक सुबत्ता निर्माण होईल.
- शशिकांत शेडगे, उपसरपंच

तुळशी गावाच्या सभोवताली प्रेक्षणीय स्थळे आहेत, मात्र ती दुर्लक्षित आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून या स्थळांचा विकास व्हावा. पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यास विकास होण्यास मदत होईल. शासनाने याकडे लक्ष द्यावे.
- संजय शेडगे, माजी सरपंच

भौगोलिक रचनेच्या अनुषंगाने येथे कृषी पर्यटनही बहरू शकते. पर्यटनाच्या कलात्मक नियोजनाने विविध स्तरांवर रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
-समीर पारधी, ग्रामस्थ व प्रगत शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com