मांगेलीत तळीराम पर्यटकांना लावला ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

दोडामार्ग - मांगेलीत वर्षा पर्यटनासाठी आलेल्या तीस पर्यटकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत तर चार पर्यटकांवर ड्रंक ॲण्ड ड्राईव्हचे गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक पर्यटक धूम स्टाईलने किंवा मद्यपान करून गाड्या चालवत असले तरी पोलिसांच्या अपुऱ्या संख्येमुळे कारवाईला मर्यादा येत आहेत.

दोडामार्ग - मांगेलीत वर्षा पर्यटनासाठी आलेल्या तीस पर्यटकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत तर चार पर्यटकांवर ड्रंक ॲण्ड ड्राईव्हचे गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक पर्यटक धूम स्टाईलने किंवा मद्यपान करून गाड्या चालवत असले तरी पोलिसांच्या अपुऱ्या संख्येमुळे कारवाईला मर्यादा येत आहेत.

मांगेलीचे वर्षा पर्यटन शनिवार आणि रविवारी ऐन भरात आले होते. रविवारी तर मोठ्या संख्येने पर्यटक मांगेलीत वर्षा पर्यटनासाठी आले होते. पत्येक विकएन्डला पर्यटकांची होणारी गर्दी आणि अतिउत्साही किंवा मद्यपी पर्यटकांकडून आरडाओरडा, स्थानिकांशी बाचाबाची, धुम स्टाईलने ड्रायव्हींग किंवा अनेकांचा जीव जोखमीत घालण्याच्या प्रकारामुळे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

झरेबांबर-पिकुळे तिठा येथे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव व त्यांचे सहकारी तर मांगेलीत तळेवाडीच्या अलिकडे पोलिस उपनिरीक्षक पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहन तपासणी करण्यास सकाळपासूनच सुरवात केली होती.

मांगेलीकडे जाणाऱ्या सर्व गाड्या दोन्ही ठिकाणी तपासल्या जात होत्या. झरेबांबर तिठा येथे अनेक गाड्यांमध्ये दारुच्या बाटल्या आढळल्या. त्या काढून घेऊन वाहने सोडण्यात आली. तसेच संशयित चालकांची ब्रेथ ॲनालायझरव्दारे मद्यपानाबाबतची तपासणी करण्यात येत होती.

तळेवाडीच्या अलीकडे मांगेलीतही सर्वच वाहने तपासली जात होती. झरेबांबर तिठा येथे पाऊस नव्हता तर मांगेलीत पाऊस आणि धुक्‍याचा जोर होता. धुक्‍यातूनच काही वाहन चालक धूम स्टाईलने गाड्या चालवून स्वतःबरोबरच इतरांचाही जीव धोक्‍यात घालत होते. त्यामुळे त्यांच्या कागदपत्रांची, चालक परवान्यांची आणि चालकाने मद्य घेतले किंवा नाही याची तपासणी होत होती. पोलिस कर्मचारी श्री. गवस, श्री. दळवी, ज्योती हरमलकर, श्री. धुमाळे आणि त्यांचे सहकारी दिवसभर तपासणी करत होते. मात्र पर्यटकांची संख्या जास्त, वाहनांची सतत ये-जा त्यामुळे अपुऱ्या पोलिस बळामुळे सर्वच वाहनांची व चालकांची तपासणी करण्यात मर्यादा येत होत्या.

मांगेलीत पडणारा मुसळधार पाऊस, थंडी आणि धुके यामुळे आजचा रविवार पर्यटकांनी एन्जॉय केला. त्यातील मद्यपी व अतिउत्साही पर्यटकांना ताळ्यावर आणण्याचे काम पोलिस विभागाने त्यांच्याविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार आणि ड्रंक ॲण्ड ड्राईव्हचे गुन्हे दाखल करून केले असले तरी पोलिसांच्या अपुऱ्या संख्याबळामुळे कारवाईला मर्यादा येत आहेत. पोलिस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांनी विकएन्डला होणारी गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्तासाठी आणखी कर्मचारी नियुक्त करण्याची गरज आहे.

म्हणून ते पर्यटक सिंधुदुर्गात
वर्षा पर्यटनासाठी मांगेलीत येणाऱ्यांमध्ये गोवावासीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे त्यात गोवा पोलिसांची संख्याही लक्षणीय आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी तपासणीसाठी वाहने थांबवली कि सऱ्हास अनेकजण आपण गोवा पोलिस असल्याचे सांगतात आणि कारवाईबाबत व्दिधा अवस्था स्थानिक पोलिसांची होते. गोव्यातील धबधब्यावर होणारा धांगडधिंगा आणि त्रास टाळण्यासाठी गोव्यात तपासणी व कारवाई कडक असल्याने गोव्यातील पर्यटकांनी मांगेलीला पसंती दिली आहे; मात्र ती धोक्‍याची घंटा मानली जात आहे.

दारू आणूच नका
मांगेलीत वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असाल तर सोबत दारु आणूच नका. ती वाटेत जप्त केली जाईल, शिवाय ब्रेथ ॲनालायझरव्दारे तपासणी करून मद्यपी वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले जातील, त्यामुळे दारू आणूच नका. वर्षा पर्यटनाचा आनंद तुम्ही घ्या आणि इतरांना घेऊ द्या, असे आवाहन पोलिसांनी पर्यटकांना केले आहे.

Web Title: konkan news tourist