वेंगुर्ले दीड वर्षात टंचाईमुक्त करू - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

वेंगुर्ले - तिलारीचे पाणी वेंगुर्लेकडे वळवले जाणार आहे. यामुळे येत्या दीड वर्षात वेंगुर्ले शहर टंचाईमुक्त होईल, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

वेंगुर्ले - तिलारीचे पाणी वेंगुर्लेकडे वळवले जाणार आहे. यामुळे येत्या दीड वर्षात वेंगुर्ले शहर टंचाईमुक्त होईल, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

येथील पालिकेच्या १४१ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल पालिकेच्या शिवाजी सभागृहात माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, ज्येष्ठ पत्रकार, निवृत्त कर्मचारी यांच्या आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी श्री. केसरकर बोलत होते. या वेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, पंचायत समिती सभापती यशवंत परब, मुख्याधिकारी रामदास कोकरे, पाणीपुरवठा सभापती सुमन निकम, आरोग्य सभापती नागेश गावडे आदी उपस्थित होते. या वेळी माजी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. तसेच मॅरेथॉन व जलतरण स्पर्धेचेही बक्षीस वितरण झाले. 

या वेळी श्री. केसरकर म्हणाले, ‘‘शहराला पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाय म्हणून निशाण तलावाच्या धरणाची उंची वाढविण्यासाठी भरघोस निधी दिला आहे. नवीन पाइपलाइनही टाकण्यात येणार आहे. तसेच तिलारी धरणाचे पाणीही वेंगुर्लेकडे वळविण्यात येणार असल्याने पुढील दीड वर्षात शहर पाणीटंचाईच्या समस्येतून मुक्त होणार आहे. पालिकेच्या जुन्या इमारतीच्या प्रतिकृतीचा ठेवा जपून १५० व्या वर्धापन दिनापर्यंत एक सुसज्ज व सर्व समावेशक अशी भव्यदिव्य इमारत उभी करण्यासंदर्भात तज्ज्ञांमार्फत आराखडा आपणास सादर करावा. त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.’’ 

या वेळी माजी नगरसेवक चंद्रकांत ऊर्फ बाली गावकर यांनी पालिकेच्या इमारतीचे अभियंता आरथर कॉफर्ड यांच्यावर कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी रामदास कोकरे, नगरसेवक प्रशांत आपटे यांनी सूत्रसंचालन केले. नगराध्यक्ष राजन गिरप यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शहरातील नागरिकांसह आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पत्रकार यांसह जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर आदी उपस्थित होते.

भुयारी गटारबाबत नागरिकांना विश्‍वासात घ्या
भुयारी गटार योजनेची सभा येत्या काही दिवसांत मुंबईत होणार आहे. तत्पूर्वी शहरातील नागरिकांना विश्‍वासात घेऊन या योजनेबाबत त्यांच्या कल्पना यांचा अभ्यास करूनच मुंबईत होणाऱ्या सभेला हजर राहावे, असे आदेश पालकमंत्री केसरकर यांनी नगराध्यक्ष गिरप यांना दिले. 

वेंगुर्ले पालिकेने स्वच्छतेमध्ये देशपातळीवर नाव चमकविले आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरही वेंगुर्लेचे नाव चमकावे आणि आधुनिक शहर म्हणून शहराकडे जगाने पाहावे यासाठी सर्व शहरवासीयांनी प्रयत्न करावे.
- दीपक केसरकर, पालकमंत्री सिंधुदुर्ग.

Web Title: konkan news vengurle water shortage free in 1.5 years