कोकण रेल्वे प्रशासन लोकोपायलटपुढे नमले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

रत्नागिरी - लोकोपायलट आणि गुडस्‌ गार्ड यांनी सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या कामबंद आंदोलनापुढे नमते घेत कोकण रेल्वे प्रशासनाने दोन गाड्यांमधील विश्रांतीचा काळ सहा तासांवरून आठ तास करण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब केले.

रत्नागिरी - लोकोपायलट आणि गुडस्‌ गार्ड यांनी सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या कामबंद आंदोलनापुढे नमते घेत कोकण रेल्वे प्रशासनाने दोन गाड्यांमधील विश्रांतीचा काळ सहा तासांवरून आठ तास करण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब केले.

मंगळवारी (ता. १८) दुपारी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने एमआयडीसीतील रेल्वेच्या विभागीय कार्यालयापुढे धरणे धरले. तीन तासांच्या कामबंदमुळे मालवाहतुकीच्या गाड्या रत्नागिरी स्थानकात अडकून पडल्या; मात्र प्रवासी गाड्यांवर परिणाम होऊ देण्यात आला नाही. लोकोपायलटला आठ तास काम केल्यानंतर दुसरी गाडी सुरू करण्यापूर्वी आठ तासांची विश्रांती आवश्‍यक असते; कोकण रेल्वे प्रशासनाच्या बेलापूर कार्यालयातून प्राप्त झालेल्या आदेशानुसार विश्रांतीचा कालावधी सहा तास करण्यात आला. लोकोपायलटला सहा तासांनंतर सेवा बजवावी लागेल, असे आदेश काढण्यात आले.

कोकण रेल्वे प्रशासनाने आज पुन्हा सहा तासांनंतर ड्यूटी करावी लागेल, असा पवित्रा घेतला. त्यामुळे पुन्हा कामबंदचा निर्णय घ्यावा लागला. या आंदोलनाचा प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार नाही, याची काळजी आम्ही घेतली होती.
- कुमार घोसाळकर,
युनियन नेते

रेल्वे प्रशासनाच्या या धोरणाला लाल बावटा संघटनेने सोमवारी (ता. १७) सायंकाळी अचानक दणका दिला. कामबंद आंदोलन केल्यामुळे रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली होती. मंगळवारी पुन्हा रेल्वे प्रशासनाने सहा तासांचाच धोशा लावून धरला. त्यामुळे रेल्वे मजदूर संघटनेने दुपारी १२ वाजता कामबंद आंदोलन सुरू केले. यामध्ये ६२ कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर पुन्हा रेल्वे अधिकाऱ्यांशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा झाली. कामबंदच्या झटक्‍यामुळे प्रशासनाने आठ तासांच्या विश्रांतीला हिरवा कंदील दिला. यासंदर्भात बेलापूर येथे पुढील आठवड्यात चर्चा करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे. तेथे संचालक अरुण गुजराथी यांच्याबरोबर बैठक होणार आहे.

Web Title: Konkan Railway Administration lapsed before Locopilot