'कोकण रेल्वेचे खासगीकरण झाल्यास रक्त सांडेल'

Konkan Railway Injustice Redressal Committee Chairman Shaukat Mukadam altimeter to central government
Konkan Railway Injustice Redressal Committee Chairman Shaukat Mukadam altimeter to central government

चिपळूण  - कोकण रेल्वेचे खासगीकरण झाल्यास कोकणातील रेल्वे मार्गावरून एकही गाडी जाऊ देणार नाही, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला आहे. रक्त सांडले तरीही खासगीकरणाला विरोध राहिल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


केंद्र सरकारने कोकण रेल्वेचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्याबाबत कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी तीव्र विरोध केला असून रेल्वेमंत्र्यांना त्याबाबत निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोकण रेल्वेचे खाजगीकरण झाल्यास येथे धनदांडग्यांची दादागिरी वाढेल. स्थानिक प्रवाशांसह कर्मचारी व प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होईल. आताच या रेल्वेचा फायदा दाक्षिणात्य राज्यांना अधिक होतो. या पुढे कोकण रेल्वे हे नाव केवळ नावापुरतेच राहील, तिकिटाचे दर मनमानीने भरमसाठ वाढविले जातील. त्यामुळे सामान्य माणसाला प्रवास करणे अवघड होईल. कोकणी माणसाच्या मूळावर येणारा हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करू नये तसे झाले तर कोकणी जनाता गप्प बसणार नाही. या आंदोलनात अनेक कामगार संघटना प्रकल्पग्रस्तही आमच्यासोबत असतील असा इशाराही श्री.मुकादम यांनी दिला आहे.

कोकण रेल्वेचे प्रणेते माजी केंद्रीय अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांनी कोकणचा विकास व्हावा व कोकणची नाळ मुंबईशी अधिक घट्ट जुळावी, येथील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा. कोकणचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने कोकण रेल्वे हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. कोकणातील जनतेने या प्रकल्पासाठी आपल्या बहुमूल्य जमिनी देऊन योगदान दिले. यावेळी रेल्वेत कोकणातील भूमीपुत्रांना व प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍या देण्याचे आमिष दाखविण्यात आले. पण प्रत्यक्षात हे आश्वासन अद्याप पाळलेले नाही. कोकण रेल्वेत कोकण दिसेल ही अपेक्षाही फोल ठरली. कोकणी माणसाच्या तोंडाला पाने पुसून या मार्गावरुन इतर राज्यातील गाड्याच अधिक धाऊ लागल्या आणि कोकणी माणसाच्या नशिबी बोटावर मोजण्या इतपतच गाड्या राहिल्या.

कोकण रेल्वे प्रकल्पात कोकणवासियांची फसवणूकच अधिक झाली आहे. आता तर केंद्र सरकारने खासगीकरण करुन कोकणवासियांच्या उरल्यासुरल्या अपेक्षांवर पाणी फेरण्याचा घाट घातला आहे. त्याला संपूर्ण कोकणातून विरोध होत आहे. विविध संघटनांनी याबाबत आपल्याशी चर्चा केली असून आपल्याला पाठिंबा दर्शविला आहे असेही श्री मुकादम यांनी सांगितले. 


 
 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com