कोकण रेल्वे प्रवासी संघटना 'या' मागण्यासाठी करणार आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

कोकणातील 10 लाखांहून अधिक कुटुंबे मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, पुणे भागात आपल्या उदरनिर्वाहासाठी स्थायीक असून सणावाराला, कौटुंबिक बऱ्यावाईट प्रसंगी, जत्रा - महोत्सव, धार्मिक विधी यासाठी आपल्या जन्म भूमीशी संपर्क असल्याने वारंवार फेऱ्या मारत असतात..'' 

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 मे रोजी सावंतवाडीत एल्गार आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिली. 

याबाबत श्री. सावंत म्हणाले, ""19 मे 2019 ला सावंतवाडी येथे केलेल्या उपोषणानंतर अनेक राजकीय नेत्यांनी रेल्वे मंत्री व मध्य रेल्वे, पश्‍चिम रेल्वे व कोकण रेल्वे यांच्याशी संपर्क साधून कोकण रेल्वे प्रवासी संघटनांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले होते; मात्र त्यानंतर तुतारी एक्‍स्प्रेसला एक वातानुकूलीत, 2 स्लीपर व 2 जनरल डबे जोडण्याबरोबरच जनशताब्दी एक्‍स्प्रेसला सावंतवाडी येथे नेत्रावती एक्‍स्प्रेसला खेड येथे अंशकालीन थांबा देण्याची मोठी मेहरबानी केल्याचा निरर्थक आव रेल्वे प्रशासनाने आणला. कारण दोन्ही ठिकाणी थांबा दिला; पण आरक्षण नाही. त्यामुळे आजही कोकणातील प्रवाशांवर कोकण रेल्वे प्रशासन अन्यायच करत आहे.'' 

ते पुढे म्हणाले, ""कोकणातील 10 लाखांहून अधिक कुटुंबे मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, पुणे भागात आपल्या उदरनिर्वाहासाठी स्थायीक असून सणावाराला, कौटुंबिक बऱ्यावाईट प्रसंगी, जत्रा - महोत्सव, धार्मिक विधी यासाठी आपल्या जन्म भूमीशी संपर्क असल्याने वारंवार फेऱ्या मारत असतात..'' 

दक्षिण-उत्तर भारतात धावणाऱ्या गाड्यांना मुबलक गर्दी पाहून जादा डबे जोडण्यात येतात. कोकण रेल्वे साठी कोकणी जनतेने आपल्या बहुमुल्य जमीनी दिल्या तरी कोकण रेल्वे प्रवासी आता पर्यंत गेली तेवीस वर्षे सर्व सहन करत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाला जोरदार धक्का देण्यासाठी 1 मे रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या एल्गार आंदोलनाचे आयोजन केले आहे. या आंदोलनाची आतापासूनच तयारी करण्यासाठी विभागवार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तरी कोकण रेल्वे मार्गावरील कोकणी प्रवाशांनी या आंदोलनात सहभागी होऊन विभागाच्या संघटनाना सहकार्य करावे व एल्गार आंदोलन करुन रेल्वे प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. सावंत यांनी केले आहे. 

या आहेत मागण्या 

 • दादर - रत्नागिरी सकाळी सुटणारी पॅसेंजर, वसई डहाणू - सावंतवाडी व कल्याण- सावंतवाडी गाडी त्वरीत चालू करणे. 
 • मुंबईवरून सुटणाऱ्या व दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांना रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी तीन ठिकाणी हवेत थांबे. 
 • उत्तर - दक्षिण जाणाऱ्या गाड्यांना (पालघर जिल्ह्यात सुद्धा) हवेत प्रत्येकी दोन ठिकाणी थांबे. 
 • कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत समाविष्ट करुन मुख्यालय रोहा ते मडगाव दरम्यान हलवावे. 
 • गरीब रथ गाडीची वेळ चार ते पाच तास आधी किंवा उशिरा करण्यात यावी. 
 • तुतारी एक्‍स्प्रेस व दिवा पॅसेंजर गाडी 22 / 23 डब्यांची करण्यात यावी. 
 • पुणे एर्नाकुलम गाडी आठवड्यातून दोन दिवस धावते. उरलेले पाच दिवस कल्याण मार्गे सावंतवाडीपर्यंत सोडावी. 
 • वांद्रे मंगलोर गाडी बारमाही सोडण्यात यावी. 
 • सुट्टी कालीन गाड्या सुर्यास्तापूर्वी कोकणात पोहोचतील अशा बेताने सोडाव्यात. 
 • डहाणू पनवेल मेमु चिपळूणपर्यंत वाढविण्यात यावी 
   

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Railway Travelers Association Agitation For Different Demands