#KonkanRain तळेरे - कोल्हापुर मार्ग ठप्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

वैभववाडी - जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असुन पावसामुळे अनेक भागात पुरसदृश्‍य स्थिती निर्माण झाली आहे. वैभववाडी तालुक्‍यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे खारेपाटणला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

वैभववाडी - जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असुन पावसामुळे अनेक भागात पुरसदृश्‍य स्थिती निर्माण झाली आहे. वैभववाडी तालुक्‍यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे खारेपाटणला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

मांडकुली, किरवे आणि लोंघे (जि. कोल्हापुर) या तीन ठिकाणी रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे तळेरे - कोल्हापुर मार्गावरील वाहतुक आज पहाटेपासुन ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतुक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे.

जिल्ह्यात काल (ता.29) पहाटे चार वाजल्यापासुन मुसळधार पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील वैभववाडी, दोडामार्ग, कुडाळ, कणकवली या चार तालुक्‍यांना पावसाने अक्षरक्षः झोडपुन काढले होते. कालच्या तुलनेत पावसाचा जोर किंचीत कमी झाला असला तरी मुसळधार पाऊस सुरूच आहे. आज सकाळपासुन देखील जिल्ह्याच्या बहुतांशी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत.

विशेषतः वैभववाडी तालुक्‍यात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे तालुक्‍यातील शुक, शांती, कुसुर आणि अरूणा यासह अन्य नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. हे सर्व पाणी खारेपाटणला जात असल्यामुळे तेथे पुराचा धोका निर्माण होण्याची शक्‍यता वाढली आहे. खारेपाटण परिसरातील 10 एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे.

सतत पडणाऱ्या पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. सर्वाधिक वाहतुक असलेल्या तळेरे-कोल्हापुर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक आज पहाटेपासुन ठप्प झाली आहे. या मार्गावरील मांडकुली, किरवे आणि लोंघे (ता.गगनबावडा) या तीन ठिकाणी पुराचे पाणी आल्यामुळे करूळ आणि भुईबावडा घाटमार्गे होणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे.

वैभववाडीतुन गेलेली अनेक वाहने गगनबावड्यातुन माघारी पाठविण्यात आली. आज सकाळपासुन कोल्हापुरकडे निघालेली वाहने वैभववाडीतील संभाजी चौकात थांबवुन ती फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली. खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतुक उंबर्डे वैभववाडी मार्गे फोंडा अशी वळविण्यात आली आहे.

घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहील्यास या मार्गावरील वाहतुक आणखी एक दोन दिवस बंद राहण्याची शक्‍यता आहे.
जिल्ह्यातील चार तालुक्‍यांमध्ये आज सकाळी आठवाजेपर्यत झालेल्या पावसाची नोंद 100 मिलीमीटर पेक्षा जास्त आहे. सर्वाधीक पाऊस दोडामार्ग तालुक्‍यात 139 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर कुडाळ-134 मिलीमीटर, कणकवली-109 मिलीमीटर, वैभववाडी-109 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Rain flood water on Talere Kolhapur highway