कोकणात पावसाचा धुमाकूळ, परशुराम घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

konkan rain update

२ जुलैच्या रात्री ११ वाजता घाटातील दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद झाली होती.

कोकणात पावसाचा धुमाकूळ, परशुराम घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद

चिपळूण - परशुराम घाट आता सतत धोक्याची घंटा वाजवू लागला आहे. शनिवारी रात्री दरड कोसळल्याने घाट काहीकाळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. पुन्हा सोमवारी पावसाचा जोर वाढताच माती रस्त्यावर येत असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव सायंकाळी ४ वाजल्यापासून घाटातील वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी मार्ग म्हणून कळंबस्ते चिरणीमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.

चिपळूण येथील परशुराम घाट गेले काहीवर्ष धोकादायक ठरू लागला आहे. दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. आता तर चौपदरीकरणासाठी येथे मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई केली आहे. त्यामुळे दरडीचा धोका अधिक वाढला असून माती दगड रस्त्यावर येण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. शनिवारी (ता. २) रात्री घाटातील दरडीची माती व दगड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने घाटातील वाहतूक काही काळ बंद ठेवली होती. रस्त्यावरून माती बाजूला केल्यानंतर पहाटे पुन्हा वाहतूक सुरू केली होती. वाहतूक सुरू होऊन २४ तास उलटत नाहीत, तोच पुन्हा एकदा परशुराम घाट धोक्याची घंटा वाजवू लागला आहे.

हेही वाचा: पुण्यात सेनेला मोठं खिंडार, 5 नगरसेवक शिंदे गटात सामील होणार?

घाटात माती हळूहळू खाली घसरत असल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, महामार्ग विभागाचे अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी तत्काळ परशुराम घाटात धाव घेऊन पाहणी केली व सायंकाळी ४ वाजल्यापासून घाटातील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरड कोसळली नसली तरी माती खाली येत असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव घाटातील वाहतूक बंद करून येथील कळंबस्ते चिरणीमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.

अधिकारी घाट परिसरात ठाण मांडून

रात्रभर घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून सकाळी पुन्हा पाहणी केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.व त्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी घाट परिसरात ठाण मांडून राहिले आहेत. तसेच सर्व यंत्रणा देखील सज्ज ठेवली आहे.

हेही वाचा: नवी मुंबईत मुसळधार, पावसाच्या पाण्यात अडकली स्कुलबस

Web Title: Konkan Rain Update Parshuram Ghat Again Closed For Transportation Heavy Rain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..