#KonkanRains राजापूरला आले बेटाचे स्वरूप 

#KonkanRains राजापूरला आले बेटाचे स्वरूप 

राजापूर - गेले आठवडाभर कोसळणाऱ्या संततधारेने राजापूर तालुक्‍यात जलप्रलयच झाला आहे. सलग सहाव्या दिवशी राजापूर शहरात पूर आला असून त्यामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने काल रात्रीपासून थांबलेल्या वाहनांची काही किलोमीटरची रांग उभी आहे.

तालुका तसेच शहरांतर्गत सर्व रस्ते बंद झाले आहेत. शहरात काही ठिकाणी 15 फुटापेक्षा जास्त पाणी आहे. अंतर्गत मार्ग अनेक ठिकाणी खचले असून भूस्खलनामुळे तीन घरांना धोका निर्माण झाला आहे. 

अर्जुना व कोदवली नद्यांना जणू महापूर आला. गेले पाच दिवस राजापूर शहर बाजारपेठेत पुराचे पाणी तळ ठोकून आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले.अर्जुनाने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने पूल रविवारी मध्यरात्रीपासून वाहतुकीला बंद करण्यात आला. गेले तीन दिवस अडकून पडल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे, घरे व गोठयांची पडझड झाली. विजपुरवठाही ठप्प झाला आहे. एसटीसेवा दुसऱ्या दिवशीही ठप्प आहे. राजापूर शहर व तालुक्‍यातील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. 

राजापूर कोदवली हर्डी रानतळे कडून पुढे धारतळे पावस रत्नागिरीकडे जाणारा मार्ग खचला आहे. या मार्गावर रस्त्याच्या मधोमध भेगा पडल्याने वाहतुकीला बंद करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूरकडून तत्काळ या ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून उपअभियंता कदम हे या ठिकाणी जातीनिशी लक्ष ठेऊन आहेत. पर्यायी मार्गाचे काम सुरू असून छोटया वाहनांसाठी हा मार्ग खुला केला जाईल, अशी माहिती बांधकाम विागाकडून देण्यात आली आहे. राजापूर शहरात आंबेवाडी येथे एक आंबा कलम मोडून पडले असून, भटाळी येथे झाड पडले आहे. तालुक्‍यात कुंभवडे येथील दिलीप प्रभुदेसाई यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून त्यांचे नुकसान झाले आहे. 

आपत्ती व्यवस्थापनकडून दखल नाही 
कोदवली साईनगर येथे दीपक खडपे अनिल चव्हाण यांच्या घरावर झाड पडून त्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवूनही दखल घेतली नसल्याचे त्यानी सांगितले. कोदवली येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजित गुरव यांनी प्रांताधिकारी प्रवीण खाडे यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली व नाराजी व्यक्त केली.  

एक नजर
* सलग सहाव्या दिवशी बाजारपेठेत पाणी 
* वरचीपेठ पूल ते नरके वाहनांची रांग 
* रानतळे येथे रस्ता खचला 
* पर्यायी जैतापूर मार्गही बंद 
* धारतळे-पावस मार्गावर मधोमध भेगा 
* पाचलमध्ये भूस्खलनाने धोका उभा 
* रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली 
* सौंदळमार्गे पावस-कशेळी मार्ग बंद 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com