esakal | रत्नागिरीत 17 जूनला कोकण विकास यात्रा
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत 17 जूनला कोकण विकास यात्रा

एक नजर

  • कोकणच्या मुलभूत प्रश्‍नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन येत्या 17 जूनला
  • रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा
  • कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव याच्या नेतृत्वात यात्रा. 
  • पक्षविरहित आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगारी, मत्स्य, आंबा आणि पर्यटन विकासासाठी शासनाकडून ठोस पावले उचलण्याची मागणी. 

रत्नागिरीत 17 जूनला कोकण विकास यात्रा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - कोकणच्या मुलभूत प्रश्‍नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन होणार आहे. येत्या 17 जूनला त्याची सुरवात रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव याचे नेतृत्व करीत आहेत. पक्षविरहित आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगारी, मत्स्य, आंबा आणि पर्यटन विकासासाठी शासनाकडून ठोस पावले उचलण्याची मागणी होणार आहे.

यासाठी नियोजनाच्या बैठका पार पडत असून सोमवारपासून (ता. 10) विविध उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. 17 जूनला दुपारी 2 वाजता हातखंब्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल.

सायंकाळी 4 वाजता शहरातील मराठा मैदान येथे रत्नागिरी रोजगार हक्क परिषदेचे आयोजन केले आहे. याचे नियोजन सुरू झाले असून कोअर कमिटीच्या बैठका होत आहेत. नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यासाठी सत्याची मोहीम राबवायची असेही ठरले.

रोजगार हीच कोकणची मूळ समस्या आहे. डॉलर मिळवून देणारे पर्यटन, मत्स्योद्योग, हापूस, काजू यांचे नीट नियोजन केले तर गावागावात रोजगार निर्माण होतील. याकरिता प्रशिक्षण, पूरक धोरणे, योजना व पायाभूत सुविधांची गरज आहे. यासाठी कोकण रोजगार हक्क अभियान समृद्ध कोकण संघटनेने रचनात्मक संघर्ष उभारला आहे.

शासनाच्या विरोधात आंदोलन नसून, शासन आणि कोकणातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने विकासाचे धोरणात्मक निर्णय घेतले जाण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. कोकणातील सर्व जिल्हे, मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे येथून हजारो कोकणवासीय पर्यटन व्यावसायिक, मच्छीमार, शेतकरी, युवक, नोकरदार या धरणे आंदोलन व परिषदांमध्ये सहभागी होणार आहेत.

पावसाळी अधिवेशनात धडकणार

तारकर्ली, मालवण, रत्नागिरी, श्रीवर्धन, पालघर आणि आझाद मैदान मुंबई येथे कोकण रोजगार हक्क परिषदा आयोजित करण्यात येणार आहेत. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर या आंदोलनाला धार येणार आहे. 25 जूनला सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेमध्ये आझाद मैदानावरत कोकणातील सर्व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील आंदोलक एकत्र येऊन भूमिका शासनासमोर मांडणार आहेत.
 

loading image