कोथुर्डे धरण गळती काढल्याने महाडसह 22 गावांची पाणीटंचाई टळली

सुनील पाटकर 
सोमवार, 7 मे 2018

महाड : महाड नगरपालिकेसह 22 गावांची तहान भागवणाऱ्या तालुक्यातील कोथुर्डे धरणाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात होणारी गळती काढली गेल्याने या वर्षी मे महिन्यातही या भागातील 22 गावांमध्ये पाणीटंचाई नसल्याचे चित्र दिसत आहे.मागील वर्षी 14 एप्रिललाच या परिसरात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता.  

महाड : महाड नगरपालिकेसह 22 गावांची तहान भागवणाऱ्या तालुक्यातील कोथुर्डे धरणाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात होणारी गळती काढली गेल्याने या वर्षी मे महिन्यातही या भागातील 22 गावांमध्ये पाणीटंचाई नसल्याचे चित्र दिसत आहे.मागील वर्षी 14 एप्रिललाच या परिसरात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता.  

 या धरणाची एकुण क्षमता ही 2.72 द.ल.घ.मी. एवढी आहे. यापैकी महाड नगरपालीकेने या धरणाच्या पाण्यातील 1.11 द.ल.घ.मी. पाणी आरक्षित केले आहे. रायगड आणि दासगाव विभागातील लाडवली, वाळसुरे, करंजखोल, गोंडाळे,कोकरे, आडीअंबार्ले, मांडले, मोहोप्रे, दासगाव, गांधारपाले, केंबुर्ली, खर्डी, नांदगाव खु, नांदगाव बु, नाते, तळोशी, वहुर, वरंडोली, चापगाव, किंजळोली बु, किंजळोली खु, आणि आचळोली या गावांच्या पाणी योजना या धरणाच्या पाण्यावर अवलंबुन आहेत. कोथुर्डे धरणातुन गांधारी नदीत सोडण्यात येणा-या पाण्यावर या गावांची तहान भागते. गेले दोन वर्षे कोथुर्डे धरणाला असणाऱ्या गळतीमुळे धरणाचे लाखो लिटर पाणी वाया जात होते. त्यामुळे मार्च पासुनच या गावांना भयानक पाणी संकटाला तोंड द्यावे लागत होते.

 जसलसंपदा विभाग महाडचे उपविभागीय अभियंता प्रकाश पोळ यांनी 2017 मध्ये या दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता,नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन ही गळती 100 टक्के बंद करण्यात आली. सदर गळती बंद झाल्या मुळे  आजही नळांना येत असलेल्या पाण्याने ग्रामस्थ आमंदीत आहेत. जलयुक्त शिवार व जलसंधारणाच्या कामांमुळे विंधन विहीरी (बोअरवेल) यांना देखील पाणी साठा मुबलक आहे. त्यामुळे या भागातील भुगर्भातील पाणी पातळी स्थिरावल्याचे चित्र आहे. 

कोथुर्डे धरणाची गळती 100 टक्के बंद झाली असुन या वर्षी गांधारीला तिन ते चार वेळा पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे या पाण्यावर अवलंबून असलेल्या नगरपालिकेसह 22 ग्रामपंचायतीना मे च्या 20 तारखेपर्यंत तरी पाणी पुरवठा होणार आहे.कोथुर्डे धरणाची क्षमता वाढविण्यासाठी महाड नगरपालिकेचा प्रस्ताव प्राप्त झाला असुन, धरण भिंतीची उंची दोन फुटाने वाढवुन क्षमता वाठविण्यासाठी अधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्या बाबत अभ्यास सुरु आहे.
- प्रकाश पोळ (उपविभागीय अभियंता जलसंपदा पाटबंधारे विभाग)

Web Title: kothurde dam repairs leakage complete 22 villages water supply