पाटबंधारेचे कोयना, देवरूख कार्यालय बंद करण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

  • कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील देवरूख आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील कोयनानगर येथील कार्यालय बंद करण्याचा जलसंपदा विभागाचा निर्णय.
  • राज्य शासनाचे सचिव सुनील गांगरकर यांचा आदेश. 

चिपळूण - कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील देवरूख आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील कोयनानगर येथील कार्यालय बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. तेथील कर्मचारी व अधिकारी यांना समर्पित करून घेतले जाणार आहे. राज्य शासनाचे सचिव सुनील गांगरकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. 

कोयना प्रकल्पाचे काम सुरू असताना कोयना व अलोरे येथे जलसंपदा विभागाची अनेक कार्यालय सुरू केली. प्रकल्पाचे काम संपल्यानंतर हळूहळू ती बंद केली. अलोरे व कोयना येथे मोजकेच कार्यालय शिल्लक आहेत. तेथे पुरेसे कर्मचारी व अधिकाही नाहीत. सातारा, पुणे येथील अधिकाऱ्यांकडे कोयनानगर व अलोरे येथील कार्यालयांची प्रभारी जबाबदारी देण्यात आली आहे.

नव्या कामासाठी पुरेसा निधी नसल्यामुळे ही कार्यालय बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. यानुसार कोयनानगर येथील कोयना बांधकाम उपविभाग हे कार्यालय बंद केले. पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कारण देण्यात आले आहे. उपअभियंता व कार्यरत कर्मचाऱ्यांना इतर विभागात वर्ग करून घेतले जाणार आहे. तसेच देवरूख जलसंपत्ती सर्वेक्षण व अन्वेषण उपविभाग हे कार्यालय पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे बंद करण्यात आले आहे. हे कार्यालय कुवारबाव येथील अधीक्षक अभियंता पाटबंधारे मंडळ यांच्या अधिपत्याखाली चालू होते. कर्मचारी नसल्यामुळे कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Koyana, Devrukh Irrigation department office closed