कोयना अवजल जाणार पुन्हा शिवसागरात

मुझफ्फर खान
सोमवार, 25 मार्च 2019

उदंचन योजना काय?
कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणारे पाणी कालव्याद्वारे नांदिवसे, तिवडी भागात नेऊन तेथून पुन्हा कालव्यामार्गे ते कोयना धरणात सोडले जाणार आहे. या प्रक्रियेला उदंचन योजना असे म्हटले जाते.

चिपळूण - कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी (अवजल) अरबी समुद्राला जाऊन मिळते. ते पाणी वाया जाऊ न देता उदंचन योजनेद्वारे पुन्हा कोयना धरणात आणून त्यातून वीजनिर्मिती करण्याची योजना शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्रीकांत हुद्दार यांनी दिली. ही योजना अंमलात आल्यास कोयनेच्या पाण्याचा अरबी समुद्रातील प्रवास थांबणार आहे. 

कोयना धरणाच्या जलनीतीत बदल करून पश्‍मिमेकडील वीज प्रकल्पासाठी दिला जाणारा पाणीसाठा कृष्णा खोऱ्यात वळविण्याचा शासन विचार करीत आहे. या कामी शासनाने अभ्यास गटाची निर्मिती केली आहे. समितीचे सदस्य आणि जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्रीकांत हुद्दार, 
दि. ना. मोरे यांनी नुकतीच कोयना प्रकल्पाला भेट दिली. या वेळी शासन उदंचन योजनेला गती देण्याच्या विचार असल्याची माहिती दिली. 

कोयना धरणातील पाण्यावर महानिर्मितीच्या पोफळी येथील प्रकल्पात वीजनिर्मिती केली जाते. नंतर हे पाणी कालव्यामार्गे वाशिष्ठी नदीत सोडले जाते. चिपळूण शहर आणि वाशिष्ठी नदीलगतच्या गावांची पाणी योजनेसाठी कोयनेचे पाणी उचलले जाते. उर्वरित पाणी अरबी समुद्राला मिळते. पाण्याचा वापर करायचा झाल्यास पाटबंधारे विभागाकडून व्यावसायिक दराने पाणीपट्टी आकारली जाते. त्यामुळे या पाण्याचा कोणीही वापर करत नाही. कोयना अवजल वापरात यावे यासाठी शासनाने अनेक समित्या नेमल्या. त्या समित्यांचा अहवाल विधानसभेच्या पटलावर कधी आलाच नाही. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी कोयनेच्या पाण्यावर कोकणात सहकार रुजविण्याची संकल्पना मांडली होती.

पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी हे पाणी रेल्वेमार्गे मुंबईकडे नेण्याचाही प्रयत्न केला होता. त्याला स्थानिकांकडून विरोध झाला. अखेर हे पाणी उदंचन योजनेद्वारे वापरण्याची योजना शासनाने आखली आहे. त्याला गती दिली जाणार आहे. 

उदंचन योजना काय?
कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणारे पाणी कालव्याद्वारे नांदिवसे, तिवडी भागात नेऊन तेथून पुन्हा कालव्यामार्गे ते कोयना धरणात सोडले जाणार आहे. या प्रक्रियेला उदंचन योजना असे म्हटले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Koyana water resend in Shivsagar