९० शाळांमध्ये कृतियुक्त अध्ययन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

रत्नागिरी - कृतियुक्त अध्ययन प्रणालीद्वारे (एबीएल) जिल्ह्यातील ९० शाळांमध्ये शिक्षकांनी अध्यापनास सुरवात केली आहे. ३६ लाखांच्या निधीतून प्रणाली सुरू झाली आहे. याचा आढावा घेऊन पुढील वर्षी आणखी शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.

शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात चार तालुक्‍यांमधील शिक्षकांना एबीएलचे प्रशिक्षण देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण सभापती विलास चाळके, विस्तार अधिकारी सुधाकर मुरकुटे, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण, एबीएलचे राज्य समन्वयक संजय देखणे, जिल्हा समन्वयक मंदार ढेकणे आदी उपस्थित होते. एबीएलच्या प्रशिक्षणात सिद्धार्थ चव्हाण, मनोदकुमार पुरंदरे, महादेव राऊत, जे. के. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

विलास चाळके यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात राज्यात अग्रेसर होण्यासाठी शिक्षकांचे योगदान मिळते. शैक्षणिक विकासासाठी लागणारी सर्व ती मदत केली जाईल. शिक्षणाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारीही गुणवत्ता वाढीसाठी मेहनत घेत आहेत. जिल्ह्यातील ११४ शाळांमध्ये गतवर्षी डिजिटलायझेशनसाठी लोकसहभागातून संगणक संच दिले, यंदाही देण्यात येतील.

काय आहे ‘एबीएल’?
अध्ययनाला कृतीची जोड दिली, विद्यार्थ्यांच्या हाताला काम दिले आणि हे काम करत करत मुले शिकू लागली तर ती शाळेत रमतील, असे ‘एबीएल’चे प्रणेते डेव्हिड हॉर्सबर्ग यांनी म्हटले होते. त्यानुसार अध्ययन कार्ड, लॅडर, साईड लॅडर, लोगो, समूह थाळी, माईल स्टोन, फ्लॅश कार्ड, भौतिक सुविधा आदी टप्प्यांवर विद्यार्थ्यांना शिकवले जाते. राज्यातील १९ जिल्ह्यांतील चार हजार शाळांमध्ये एबीएल तत्त्वावर अध्यापन केले जाते. याकरिता शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते.

Web Title: krtiyukta study 90 schools