गिरणी कामगारांसाठी ‘करो या मरो’ - दत्ता इस्वलकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

कुडाळ - न्याय्य हक्कासाठी आता ‘करो या मरो’ हेच अंतिम शस्त्र आहे. गिरणी कामगारांच्या प्रश्‍नासाठी अनेक लढे, आंदोलने झाली. आता १ ऑगस्टला विधानसभेवर होणाऱ्या महामोर्चासाठी लाखोंच्या संख्येने जमा व्हा, सरकारला आपली ताकद दाखवू, असे आवाहन गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांनी आजच्या सभेत केले.

कुडाळ - न्याय्य हक्कासाठी आता ‘करो या मरो’ हेच अंतिम शस्त्र आहे. गिरणी कामगारांच्या प्रश्‍नासाठी अनेक लढे, आंदोलने झाली. आता १ ऑगस्टला विधानसभेवर होणाऱ्या महामोर्चासाठी लाखोंच्या संख्येने जमा व्हा, सरकारला आपली ताकद दाखवू, असे आवाहन गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांनी आजच्या सभेत केले.

कोकणसह राज्यात सुमारे पावणे दोन लाख गिरणी कामगार आहेत. प्रत्येक सरकारने या गिरणी कामगारांना फक्त आश्‍वासने दिली. आता केवळ आश्‍वासने नकोत तर प्रत्येक गिरणी कामगारांना मुंबईमध्ये हक्काचे घर मिळाले पाहिजे. यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाच्या माध्यमातून १ ऑगस्टला लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनी विधानसभेवर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबाबत नियोजनाची सभा येथील महालक्ष्मी सभागृहात इस्वलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी कामगार नेते अण्णा शिर्सेकर, सुनील बोरकर, गोविंद मोहिते, रत्नागिरीचे मनोहर जाडे, सुधीर भोसले, गिरणी कामगारांचे नेते दिनकर मसगे, प्रभाकर काराणे, मोहन सावंत, जयश्री सावंत, रत्नप्रभा तेली, शरद परब, रामचंद्र कोठावळे, मनोरमा परब, स्वाती पेडणेकर, लॉरेन्स डिसोझा, शामसुंदर कुंभार, रामकृष्ण मोरजकर, जिल्ह्यातील गिरणी कामगार, त्यांचे वारस, महिला वर्ग उपस्थित होते.

इस्वलकर म्हणाले, ‘‘१ ऑगस्टचा महामोर्चा हा सरकारच्या विरोधात असणार आहे. करो या मरो हीच भूमिका आता घ्यायची आहे. वेळप्रसंगी हुतात्मा झालो तरी चालेल; मात्र या महामोर्चाला लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा. गेले कित्येक वर्षे आपण अनेक लढाई केल्या. कोकणसह राज्यात पावणे दोन लाख गिरणी कामगार आहेत. प्रत्येकाला घर कसे मिळेल हेच आमचे आता अंतिम लक्ष्य आहे. प्रत्येक वर्षाला पंचवीस हजार घरे द्या. जेणेकरून पाच वर्षात प्रत्येकाला घर मिळेल. यासाठी सरकारला जागे करण्याचे काम करूया. गिरगाव-चौपाटी येथून महामोर्चाला निघायचे आहे. या महामोर्चातून सरकारला मोठा धक्का देवूया.’’

अण्णा शिर्सेकर म्हणाले,‘‘गिरणी कामगारांना म्हाडाने खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला म्हाडाकडून घराबाबत पत्रे येतील. ती पत्रे जपून ठेवा व केव्हा मिळाले याची नोंद करा. ज्यांनी फॉर्म भरले नाहीत. त्यांनी ३१ जुलैपर्यंत फॉर्म भरावे. आमच्या हातात सत्ता द्या म्हणणाऱ्या आताच्या सरकारला आपली ताकद मोर्चातून दाखवूया.’’

माजी उपसभापती मोहन सावंत यांनी गिरणी कामगारांचा १ ऑगस्टचा ऐतिहासिक लढा आहे. सत्ताधाऱ्यांवर विश्‍वास न ठेवता न्याय हक्कासाठी एकत्र या असे आवाहन केले. श्री. बोरकर यांनीही मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन व आभार दिनकर मसगे यांनी मानले. 

दिवा गाडीतून ३१ ला मुंबईकडे...
सर्व गिरणी कामगारांनी ३१ जुलैला सावंतवाडी-मळगाव येथून दिवा गाडीने निघायचे आहे. तीन व चार नंबरचे डबे गिरणी कामगारांसाठी आहेत. ज्यांनी अजूनही फॉर्म भरले नाहीत, त्यांनी पिंगुळी-गुढीपूर कार्यालयातून फॉर्म घ्यावेत, असे आवाहन श्री. मसगे यांनी केले.

Web Title: kudal konkan news mill worker karo ya maro