कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक कोरोना बाधित....

शिवप्रसाद देसाई | Tuesday, 21 July 2020

जिल्हा राज्यात द्वितीय असल्याची गोड बातमी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये पोचते न पोचते तोपर्यंत

ओरोस (सिंधुदुर्ग) : कोरोना रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारित सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात द्वितीय असल्याची गोड बातमी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये पोचते न पोचते तोपर्यंत दूसरी धक्कादायक बातमी येवून धडकली. कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक कोरोना बाधित झाल्याची ही वार्ता नागरिकांत पोहोचताच पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ माजली. आमदार नाईक हे कोरोना बाधित असल्याचे २० जुलैला रात्री उशिरा स्पष्ट झाले.पालकमंत्री उदय सामंत यानी बोलवलेल्या बैठकीस नाईक उपस्थित होते. याला जिल्ह्यातील अतिवरीष्ठ अधिकारीही उपस्थित असल्याने पेच निर्माण झाला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत २८० कोरोना रुग्ण मिळाले आहेत. यातील पाच व्यक्तीचा मृत्यु झाला आहे. एक मुंबई येथे गेले आहेत. तर २४१ कोरोना मुक्त झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात ३३ रुग्ण सक्रिय असून ते उपचार घेत आहेत. या आकडेवारीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना रिकव्हरित राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे राज्य शासनाने मंगळवारी जाहिर केले. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला होता. पण काही वेळातच आमदार  नाईक कोरोना बाधित असल्याचे समजले. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली.

हेही वाचा- ...अन् विजयदुर्गबाबतच्या आशा पल्लवित -

नाईक यांचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वावर होता. विशेषता कुडाळ आणि मालवण तालुक्यात ते शहरापासून गावोगावी फिरत होते. तसेच अलीकडे पालकमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यात सुद्धा ते होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील  सामंत यांनी १७ जुलैला घेतलेल्या गणेशोत्सव नियोजन बैठकीला सुद्धा आ नाईक उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात  जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह प्रमुख प्रशासकीय आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आले होते .साहजिकच जिल्हाच्या निर्णय प्रक्रियेतील काही वरीष्ठाना क्वारंटाइन व्हावे लागण्याची शक्यता आहे.  त्यामुळेच आ नाईक हे कोरोना बाधित झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

संपादन - अर्चना बनगे