समुद्रस्नानासाठी भरला भाविकांचा कुंभमेळा

समुद्रस्नानासाठी भरला भाविकांचा कुंभमेळा

मालवण - ढोल-ताशांचा गजर, सनईवाद्य, पालखी-तरंग आणि रयतेच्या लवाजम्यासह येथे महोदय पर्वणीनिमित्त दाखल झालेल्या देवतांमुळे दांडी मोरयाच्या धोंडा समुद्रकिनारी भाविकांचा कुंभमेळा भरला. देवतांबरोबर समुद्रस्नानासाठी जिल्हाभरातील भाविकांनी सकाळी आठपासूनच गर्दी केली होती.

महोदय पर्वणीसाठी जिल्ह्यातून विविध ठिकाणच्या सुमारे २० हून अधिक ग्रामदेवता स्नानासाठी दांडी समुद्रकिनारी दाखल झाल्या होत्या. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पवित्रस्नानाचा सोहळा पार पडला.

तीन वर्षांनी प्रथमच सर्वांत मोठा सोमवती अमावास्या व महोदय पर्वणी योग आल्याने येथील वातावरण काल (ता. ३) रात्रीपासूनच भक्तिमय बनले होते. येथे महोदय पर्वणीनिमित्त येणाऱ्या देवतांच्या स्वागतासाठी मालवणवासीय सज्ज झाले होते. शहरात विविध ठिकाणी या ग्रामदेवतांचा मुक्काम झाला. या रात्री देव जागरण, भजन, नामस्मरण, भक्तांच्या संकटाचे शिवकळेद्वारे निवारण, मनोरंजनासाठी ट्रिकसीन युक्त दशावतार नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम झाले.

काही ग्रामदेवता आज सकाळी शहरात तरंग तसेच लवाजम्यासह दाखल झाल्या. शहरवासीयांनी सडा-रांगोळी घालून ठिकठिकाणी या देवतांचे जल्लोषी स्वागत केले. पालिकेतर्फे देवतांबरोबर आलेल्या भाविकांसाठी दोन ठिकाणी महिलांसाठी चेंजिंग रूम, वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीतर्फे मोबाईल टॉयलेट, जिल्हा परिषदेचे सदस्य हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर मित्रमंडळीतर्फे भाविकांना मोफत अल्पोपाहार, मनसेतर्फे चहाची व्यवस्था करण्यात आली होती. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी देवबाग ग्रामपंचायतीतर्फे रुग्णवाहिका, समुद्रात मच्छीमार नौका व सुरक्षारक्षक तैनात केले होते.

महोदय पर्वणीनिमित्त हजारो भाविकांनी समुद्रस्नान केले. 
दांडी मोरेश्‍वर तीर्थक्षेत्री सोमवती अमावास्या व महोदय पर्वणीनिमित्त मालवणची ग्रामदेवता श्री देव रामेश्‍वर-नारायण, तिरवडेची माऊली, तळगावचा रामेश्‍वर, पडवेचा रवळनाथ, पेंडूरचा वेताळ-सातेरी, निरुखेचा रवळनाथ, सोनवडे तफ हवेलीचा लिंगेश्‍वर, ओरोस खुर्दचा गांगेश्‍वर, सिंधुदुर्गनगरीचा रवळनाथ, भडगाव बुद्रुकचा रवळनाथ, आवळेगावचा श्री देव लिंग रवळनाथ पंचायतन, वर्देची सातेरी, नांदोसचा गिरोबा, कुंदेची पावणाई- रवळनाथ, साळेलचा गिरोबा, सरंबळची सातेरी यांनी दांडी समुद्रकिनारी, तर कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्‍वर पंचायतन, हडीचे ग्रामदैवत नागेश्‍वर, कालिका देवी, पावणाई, ओवळीयेचे ग्रामदैवत रामेश्‍वर या देवतांनी आपल्या भक्तांच्या लवाजम्यासह कोळंब- सर्जेकोट येथील समुद्रकिनारी महोदय पर्वणीनिमित्त समुद्रस्नान केले. या सहा अन्य गावांतील गाव रहाट्या व देवदेवतांनी या महोदय पर्वणीनिमित्त मंगलमयी स्नानाचा लाभ घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com