Vidhansabha2019 : कोकणात कुणबी समाजाचे स्वतंत्र उमेदवार? 

Vidhansabha2019 : कोकणात कुणबी समाजाचे स्वतंत्र उमेदवार? 

दाभोळ - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कुणबी समाजाच्या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन उद्या (ता. 17 ) दापोली शहरातील नवभारत छात्रालयाच्या सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात केले. बैठकीत विधानसभेला कुणबी समाज स्वतंत्र उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. यामुळे समाजाच्या या बैठकीकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. 

या सभेत प्रत्येकाला समाजाबद्दल भूमिका मांडण्याची संधी दिली जाणार असून राजकारणावर खुली चर्चा होणार आहे. दापोलीत कुणबी समाज बहुसंख्य असला तरी गेली अनेक वर्षे हा समाज आमदारकीपासून वंचित आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये हा समाज विखुरला असल्याने या समाजाची एकत्रित ताकद दिसून आली नाही. विविध पक्षांकडून कुणबी समाजाला उमेदवारी दिली गेली असली तरी प्रस्थापित पक्षांनी कुणबी समाजाकडे दुर्लक्ष केलेले असल्याने कुणबी समाजाची व्यक्‍ती विधानसभेला निवडून आली नाही. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी कुणबी समाजाचा स्वतंत्र उमेदवार उभा राहिल्याने मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी तत्कालीन आमदार सूर्यकांत दळवी यांना समाजाच्या उमेदवाराचा फटका बसल्याने सलग 5 टर्म निवडून आलेल्या दळवी यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर कुणबी समाजाने स्वतंत्र राजकीय वाटचाल करावी, असे समाजातील धुरीणांना वाटत होते मात्र त्यादृष्टीने कोणीही पुढाकार घेतला नाही.

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनंत गीते यांचा पराभव झाल्याने समाजामध्ये नैराश्‍याचे वातावरण पसरले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत समाजाने राजकीय पक्षाकडे उमेदवारी मागायची की स्वतंत्र उमेदवार उभा करायचा याबाबत 17 ऑगस्टच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. कुणबी समाजाच्या जिव्हाळ्याचा कुणबी भवनाचा प्रश्‍न खासदार सुनील तटकरे यांच्याकडून आगामी काही दिवसात मार्गी लागण्याची शक्‍यता असल्याने बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

उमेदवारांच्या पोटात गोळा 
आत्तापर्यंत कुणबी समाजाच्या मतांच्या जोरावरच राजकीय पक्षांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. आता कुणबी समाजानेच विधानसभेसाठी उमेदवार उभा करण्याच्या दृष्टीने चाचपणीस सुरवात केल्याने विविध राजकीय पक्षांमधून आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्या उमेदवारांच्या पोटात गोळा आला आहे. 

विकास बटावले इच्छुक 
कुणबी समाजातर्फे साकुर्डे येथील विकास रामचंद्र बटावले हे विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून उद्या होणाऱ्या या सभेत ते आपण विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगणार असल्याची चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com