उन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव

pali
pali

पाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान करणार्यांना कपडे बदलण्यासाठी खोल्या उपलब्ध नाहीत. शासकिय विश्रामगृह देखील बंद आहे. अशा अनेक गैरसुविधांमूळे येथे येणारे पर्यटक व नागरिकांची गैरसोय होत आहे. या बाबत सकाळने दीड वर्षांपूर्वी बातमी  प्रसारित केली आहे.

रायगड जिल्ह्यात महाड येथील सव अाणि सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथे गरम पाण्याचे कुंड आहेत. त्यातील उन्हेरे येथील कुंडांना पर्यटक व नागरिकांची अधिक पसंत आहे. या कुंडातील पाणी अांघोळीसाठी योग्य अाणि स्वच्छ आहे. परंतु कुंडा जवळ असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या शासकिय विश्रामगृह बंद आहे. १९९३-९४ रोजी बांधलेल्या या विश्रामगृहाची काही वर्षापुर्वी दुरुस्ती होऊनही सद्यस्थितीत विश्रामगृह बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. विश्रामगृहाच्या दुरावस्थेमुळे पर्यटकांना येथे राहता येत नाही त्यांची गैरसोय होते.

विश्रामगृहाच्या शेजारीच निर्मल भारत अभियाना अंतर्गत दोन लाख रुपये खर्चून फेब्रुवारी २०१४ मध्ये चार स्वच्छता गृह बांधण्यात आले आहेत. परंतू या स्वच्छागृहामध्ये पुर्णपणे घाण झाली आहे. काही दरवाजे तुटले आहेत. देखभाल नसल्याने या स्वच्छतागृहाचा कोणालाही वापर करता येत नाही आहे. तसेच या स्वच्छता गृहाच्या शेजारी अनेक वर्षापासून असलेले कपडे बदलण्यासाठीच्या खोल्या देखिल पुर्णपणे मोडल्या अाणि खराब झाल्या आहेत. परिणामी बाहेरील कुंडावर स्थानासाठी अालेल्या पर्यटक व लोकांना उघड्यावरच कपडे बदलावे लागतात. उन्हेर कुंड परिसरात असलेल्या विठ्ठल रखमाई मंदिरासमोरील सभामंडपाचे काम कित्येक वर्षांसून अपुर्णावस्थेत आहे. या सभागृहाचा काही भाग खाजगी जागेत असल्यामुळे काम अडले आहे असे स्थानिकांचे म्हणने आहे. तर डिपीडीसीच्या माध्यमातून फंड अाल्यास सभागृहाचे काम पुर्ण होऊ शकते असे जानकारांनी सांगितले. या सर्व सोयी सुविधा झाल्यास या भागात पर्यटकांचा ओघ अधिक वाढुन पर्यटन विकासाला चालना मिळू शकेल. पर्यटकांनी देखील येथे स्वच्छता राखून शांतता अबाधित ठेवणे गरजेचे आहे. येथील विठ्ठल रखुमाई मंदिर विश्वास्थांतर्फे तशा स्वरूपाचे फलक देखील लावण्यात आले आहेत. 

उन्हेरे गरम पाण्याचे कुंड
पालीपासून अडीच ते तीन किमी अंतरावर उन्हेरे गरम पाण्याचे कुंड आहेत. उन्हेर कुंडावर एकुण तीन कुंड आहेत. त्यातील एक कुंड थंड पाण्याचे आहे तर उर्वरित दोन कुंड गरम पाण्याचे आहेत. यापैकी थंड पाण्याचे व त्याच्या शेजारी असलेले गरम पाण्याचे कुंड उघड्यावर असून अाकाराने लहान आहेत. तर दुसरे कुंड बंदिस्त असुन त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी दोन भाग केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काही वर्षापुर्वी या कुंडाच्या भोवती टाईल्स लावुन रंगरंगोटी करण्यात आली आहे. परंतू येथील कपडे बदलण्यासाठी असलेल्या खोलीची दुरवस्था झाली आहे. सध्या ती कुलूप लावून बंद केली आहे. तसेच तेथे अस्वच्छता पसरली आहे. 

येथे शासकीय निधीतून जी कामे झाली आहेत त्यांची कुठल्याच प्रकारे दुरुस्ती व देखभाल केली जात नाही. स्वछतागृह बांधले पण तेथे पाण्याची व्यवस्था केली नाही. परिसरात कचरा कुंड्या नाहीत. पर्यटक जेवण करतात त्याचा कचरा सुद्धा तेथेच टाकलेला असतो. रात्री मद्यपींचा त्रास होतो. विश्रामगृहाची सुद्धा दुरवस्था झाली आहे. येथील विठ्ठल रखुमाई मंदिर संस्थांनाकडे कुंडाची देखभाल करण्याची अधिकृत परवानगी शासनाने दिल्यास, व त्यांना त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला तर त्यांच्या मार्फत येथे देखभाल व सुरक्षा व्यवस्थितरीत्या राखली जाऊ शकते. तसेच शासन देखील त्यांच्याकडे या संदर्भात जाब मागू शकेल.
- शिवमूर्ती पवार, पोलीस पाटील, उन्हेरे

बल्लाळेश्वरचा दर्शनासाठी आलेले भाविक तालुक्यातील हा नेसर्गिक ठेवा अनुभवण्यासाठी आवर्जून येतात. येथील परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. तेथे आवश्यक सोयी-सुविधा असणे गरजेचे आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून तसेच शासकीय निधीतून आगामी काळात येथे सोयी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. 
- साक्षी दिघे, सभापती, पंचायत समिती, पाली-सुधागड 

धार्मिक व भोगोलिकदृष्टया या ठिकाणास खूप महत्व आहे. त्यामुळे येथे असलेल्या गैरसोयी सोडविणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाकडून मुबलक निधी कुंड आणि त्याच्या परिसराच्या विकासासाठी उपलब्ध व्हावा.
- नंदकुमार देशमुख, ग्रामस्थ, उन्हेरे

शासनाने आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच कुंडाची आणि येथे असलेल्या वास्तूची नियमित देखभाल आणि दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
- राजेश जमधरे, ग्रामस्थ, उन्हेरे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com