'चार गुंठ्यासाठी सव्वा कोटी हे लोकांच्या हितासाठीच'

सकाळ वृत्तसेवा | Wednesday, 25 November 2020

नगररचनाकार यांच्या समितीने त्या जागेची किंमत १ कोटी २७ लाख रुपये निश्‍चित केली आहे.

रत्नागिरी : किल्ला, परटवणे परिसरातील नागरिकांना पाणी मिळावे यासाठी टाकी आलीमवाडीत आवश्‍यक आहे. त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे मूल्यांकन जिल्हा प्रशासनाच्या त्रिसदस्यीय समितीने केले आहे; मात्र नळ-पाणी योजना वेळेत पूर्ण होऊ नये यासाठी विरोधक त्यात खोडा घालत आहेत. विरोधकांनी कितीही कोल्हेकुई केली तरी पालिका त्रिसदस्यीय समितीने ठरवलेल्या दरानुसार जमीन खरेदी करेल, असा ठाम निर्धार शिवसेनेचे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - रत्नागिरीत आढळले अतिसाराचे ३६ रूग्ण

 

Advertising
Advertising

नगराध्यक्षांच्या दालनात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरातील परटवणे-आलीमवाडी येथील पाण्याच्या टाकीसाठी चार गुंठे जागा विकत घेण्याच्या प्रस्तावावरुन विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेला घेरले. विरोधकांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहरप्रमुख बंदरकर म्हणाले, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, नगररचनाकार यांच्या समितीने त्या जागेची किंमत १ कोटी २७ लाख रुपये निश्‍चित केली आहे. त्याचे मूल्यांकन नगरपालिकेने केलेले नाही; मात्र विरोधकांकडून चुकीचे आरोप केले जात आहेत. यापूर्वी शहरातील नळपाणी योजनेच्या कामात विरोधकांनी खो घातला होता. 

विरोधकांनी स्थगिती घेतल्यामुळे एक वर्ष हे काम लांबले; अन्यथा घराघरात पाणी पोचले असते. वर्षभरानंतर नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. पाणी योजनेचे श्रेय शिवसेनेला मिळू नये यासाठी विरोधकांकडून हा फंडा वापरला जात आहे. नगराध्यक्ष म्हणाले, परटवणे, आलीमवाडीतील नागरिकांना पाणी मिळावे या उद्देशाने सत्ताधारी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी मुरुगवाडा, खडपेवठारमधील जागा निश्‍चित केली होती. संबंधितांनी जागा देण्यास नकार दिला. तसेच फिनोलेक्‍स कंपनीने जागा भाडेतत्त्वावर देण्यास नाकारले.

शासकीय जागा सीआरझेडच्या कचाट्यात अडकली असून परवानगीसाठी बराच काळ लागणार आहे. सचिव स्तरावरुन आलेल्या पत्रानुसार मार्च २०२१ पर्यंत पाणी योजना पूर्ण करावयाची असल्याने आलीमवाडीतील चार गुंठे जागा विकत घेण्याचा प्रस्ताव सादर केला. त्याचे मूल्यांकन जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने करुन वीस दिवसांपूर्वी पालिकेला सादर केला. ते योग्य की अयोग्य हा पालिकेचा प्रश्‍न नाही.

हेही वाचा - ४८ तासांत भरा साडेनऊ लाख ; महावितरणने दिली नोटीस -

 

पटवर्धन यांनी बॅंक सांभाळावी

भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी आपली वकिली आणि बॅंक यामध्ये लक्ष घालावे. चुकीची माहिती देऊन दिशाभूल करू नये. त्यामधूनच शहरात सह्यांची मोहीम, घंटानाद आंदोलने सुरू आहेत, असा सल्ला साळवी यांनी दिला.

 

संपादन - स्नेहल कदम