संगमेश्वर तालुक्यात चाफवली - करवंजेवाडीत डोंगर खचला

संगमेश्वर तालुक्यात चाफवली - करवंजेवाडीत डोंगर खचला

देवरूख - पावसाळ्यात संगमेश्वर तालुक्‍यात जमीन खचण्याचे प्रकार सुरूच आहेत. सोमवारी (ता. १२) चाफवली - करवंजेवाडी येथे डोंगर खचून खाली आला. मोठा चर पडावा तशा प्रकारे जमीन खचली असून याची पाहणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबत शासकीय यंत्रणेला ग्रामस्थांनी कळवले असून, मंगळवारी दुपारपर्यंत येथील पाहणी झाली नव्हती.

चाफवली-करवंजेवाडीतील शेवरीचे भाटले येथे सोमवारी सायंकाळी वाडीतील ग्रामस्थ विजय विभूते, दीपक बोडेकर, संतोष बोडेकर, साहिल बोडेकर कामानिमित्त त्या ठिकाणी गेले होते. यावेळी त्यांना जमीन खचल्याचे दिसून आले. ही जमीन सुमारे अडीचशे फूट लांब आणि चाळीस फूट खोल खचली आहे. काही ठिकाणी भेगा गेल्या आहेत.  सायंकाळी ही घटना निदर्शनास आल्याने महसूलचे अधिकारी पोचू शकले नव्हते. खचलेल्या डोंगराच्या या ठिकाणी शेजारी  एक ओढा आहे. या प्रकारामुळे मनुष्यवस्तीला धोका नसला; तरी नक्‍की हा प्रकार काय याचा उलगडा संबंधित विभागाने करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

चार गावांत जमीन खचण्याचे प्रकार
तालुक्‍यात यावर्षी निवे बु. जोशीवाडी धरणाजवळ मोठ्या भेगा पडून जमीन खचली. त्यानंतर फुणगूस थूळवाडीत असे प्रकार घडले. फुणगूसमधील प्रकार अद्यापही सुरूच आहे. यानंतर साखरपा-धनगरवाडीत असा प्रकार घडला. आता चाफवली येथेही डोंगर खचल्याने भूगर्भशास्त्रज्ञांनी याची कारणे स्पष्ट करावीत, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com