सिंधुदुर्ग : आवळेगाव-कुसगाव मार्गावर दरड कोसळल्याने धोका

Risk Of Landslide On Avelgaon-Kusgaon Road
Risk Of Landslide On Avelgaon-Kusgaon Road

कडावल ( सिंधुदुर्ग) - आवळेगाव-कुसगाव मार्गावरील साटमवाडी येथे रस्त्यालगत दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे. आणखी काही भाग कोसळल्यास संपूर्ण मार्ग बंद होण्याची भीती आहे. येथे संरक्षक भिंत बांधण्याची मागणी कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी आश्‍वासने दिली, प्राथमिकस्तरावर सर्वेक्षणही झाले; परंतु नंतर काहीच कार्यवाही नाही. पुढील धोका ओळखून येथे तत्काळ संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे.

रस्ता बंद होण्याची भीती

आवळेगाव-कुसगाव मार्गावरील साटमवाडी येथे रस्त्यालगत समांतर ओढा वाहतो. हा गावातील मुख्य ओढा असून पावसाळ्यात येथील पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असतो. ओढ्याला लागूनच रस्ता असून ओढ्यापासून रस्त्याची उंची सुमारे 20 फूट आहे. गेल्या काही वर्षांपासून पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्याकडेची घाळ कोसळत होती. आता तर घाळ रस्त्यापर्यंत कोसळत आली आहे. आणखी काही भाग कोसळल्यास संपूर्ण रस्ता बंद होण्याची भीती आहे. या रस्त्यावरून एसटी बससह इतर खाजगी वाहनांची नेहमीच वर्दळ असते. घाळ रस्त्यापर्यंत कोसळत आल्याने एखादे वाहन ओढ्यात पडून अपघात होण्याचा धोका आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून ग्रामस्थांनी ओढ्याकडील दिशेने रस्त्यालगत बांबूचे कूंपण केले आहे. 

संरक्षक भिंत बांधण्याची मागणी प्रलंबित  

ओढ्यापासून रस्त्याच्या उंचीपर्यंत संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी आहे. येथे सुमारे 20 फूट उंच व 100 फूट लांब संरक्षक भिंत बांधावी लागणार आहे. संरक्षक भिंत बांधण्याबाबत येथील ग्रामस्थ कित्येक वर्षांपासून सातत्याने मागणी करत आहेत. या कामासाठी काही वर्षांपूर्वी प्राथमिकस्तरावर मोजमापही केले होते; परंतु पुढे काहीही कार्यवाही झाली नाही. हा प्रश्‍न मार्गी लावण्याबाबत काही लोकप्रतिनीधीनीही आश्‍वासने दिली; मात्र संरक्षक भिंत बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पुढील धोक्‍याचा विचार करून याबाबत त्वरित कार्यवाही होणे गरजेचे आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com