बोरजला महामार्ग चौपदरीकरणाचा भाग खचला 

चिपळूण - भोस्ते घाटातील भरावही वाहून गेला आहे. (मुझफ्फर खान : सकाळ छायाचित्रसेवा) 
चिपळूण - भोस्ते घाटातील भरावही वाहून गेला आहे. (मुझफ्फर खान : सकाळ छायाचित्रसेवा) 

चिपळूण - मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तयार झालेला नवीन रस्ता बोरज येथे ठिकठिकाणी खचला आहे. भोस्ते घाटातील मातीचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथून प्रवास करणे धोक्‍याचे झाले आहे. उद्‌घाटनापूर्वीच रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने हा रस्ता भविष्यात किती काळ टिकेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. 

खेडहून चिपळूणकडे येताना भोस्ते घाटातील अवघड वळण काढण्याचे काम सुरू आहे. त्याच ठिकाणी डांबरी रस्ता खचला आहे. खचलेला रस्ता लक्षात येऊ नये. रस्त्यावरून वाहने जाऊ नयेत म्हणून त्याठिकाणी दगडाचे ढीग रचले आहे. त्याच ठिकाणी रुंदीकरणासाठी टाकण्यात आलेला मातीचा भराव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने कामाची पोलखोल झाली आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात डोंगरातील माती खाली आल्याने रस्त्यावर चिखल साचला होता. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. अपघात टाळण्यासाठी येथे कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसत नव्हते. त्यामुळे वाहनचालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते. 

बोरज परिसरातील रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी कॉंक्रिटीकरण झाले. उन्हाळ्यातच या रस्त्याला तडे गेले होते. ठिकठिकाणी डिव्हायडर तुटलेले असताना आता रस्ताच खचला आहे. मातीचा भराव करून त्यावर झालेल्या कॉंक्रिटचा भाग खचल्याने ठेकेदाराने केलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे, हेच स्पष्ट होते. खचलेल्या कॉंक्रिटवरून वाहनांना अपघात होण्याच धोका लक्षात घेऊन सोमवारी भर पावसात कॉंक्रिट ओतण्यात आले. मात्र नव्याने कॉंक्रिट ओतलेल्या बाजूचा भाग खचल्याने कामाचे पितळ पुन्हा उघडे पडले आहे. 

आता गांधीगिरीचाच पर्याय 
महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याबाबत आम्ही ओरडत असताना सरकार आणि शासकीय यंत्रणा ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांना मातीचा भराव दिसू नये, म्हणून प्लास्टिकने मातीचा भराव झाकून ठेवला. अधिकाऱ्यांनी हे पाप लपवून ठेवले.

जगबुडी पुलावरील रस्ता खचल्यानंतर वैभव खेडेकर आक्रमक झाले. त्यांच्यावर 353 चा गुन्हा दाखल झाला. रस्ता खचला म्हणून पोलिसांनी ठेकेदार आणि शासकीय अधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र लोकप्रतिनींधीचा आवाज दाबला जात आहे. अधिकारी आणि ठेकेदारांची दहशत वाढली आहे. आता गांधीगिरी केल्याशिवाय पर्याय नाही. गणेशोत्सवात 353 रुपयांचा गणपती आणून महामार्गावर बसवणार आहे, असे आमदार संजय कदम यानी सांगितले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com