#KonkanRains अतिवृष्टीमुळेच भूस्खलन - तज्ज्ञांचा अंदाज

#KonkanRains अतिवृष्टीमुळेच भूस्खलन  - तज्ज्ञांचा अंदाज

रत्नागिरी - खडक आणि त्यावर मातीचा थर अशी भुरचना जिल्ह्यात ठिकठिकाणी आहे. प्रमाणापेक्षा अधिक पडलेल्या पावसामुळे जमिनीत झिरपलेल्या पाण्याने माती हळूहळू उताराच्या दिशेने सरकते. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन, भेगा पडणे यासारखे प्रकार घडत आहेत. नदीपात्र बदल्यामुळेही ही परिस्थिती निर्माण होत असल्याचा प्राथमिक अंदाज भूगर्भ तज्ज्ञांनी वर्तविला आहे. 

जिल्ह्यात सव्वादोन महिन्यात सरासरी 3400 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे डोंगर भागातील वाडी-वस्तींमध्ये जमिनीला भेगा जाण्याचे प्रकार घडत आहेत. जिल्ह्यात सव्वीस ठिकाणी अशा घटना घडल्या असून त्यापैकी चार ते पाच ठिकाणच्या लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे.

रत्नागिरी भूजल विभागात कार्यरत असलेल्या भूगर्भ तज्ज्ञ रश्‍मी कदम यांनी बहुतांश ठिकाणांची पाहणी केली. त्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला दिला आहे. 
कोकणातील जमिनीची रचना खडक, माती अशी आहे. प्रचंड पावसामुळे जमिनीतील पाणी झिरपण्याची क्षमताच संपली आहे. ओली झालेली माती आणि भुगर्भातील झरे प्रवाहित होत आहेत. जिल्ह्यात घडलेल्या घटना या डोंगर भागातील आहेत. तिथे हे निकष लागू होतात.

शीळ धरणाजवळ बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीमुळे माती अडून राहिली होती. मातीच्या दबावामुळे संरक्षक भिंत कोसळली आणि डोंगराच्यावरील भागात भेगा गेल्या. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नदी किंवा नाल्याचे पात्र बदलले की त्याच्या प्रभावामुळे जमिनीला भेगा पडू शकतात. ही प्रक्रिया निरंतर सुरू असते. पण हे बदल कुणाच्या लक्षात येत नाहीत. मोठ्या भेगा गेल्यानंतर घटनेचे गांभीर्य दिसते.

2005 साली ज्या ठिकाणी भेगा गेल्या होत्या, त्या यंदाच्या पावसात वाढत गेल्या आहेत. मधल्या चौदा वर्षांमध्ये त्या भागात तितकासा फरक पडला नाही. प्रमाणापेक्षा अधिक पडलेल्या पावसामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मिरजोळेसारख्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून पर्याय करता येऊ शकतो, पण सगळीकडेच हा पर्याय काम करू शकत नाही. त्यामुळे वस्ती असल्यास स्थलांतर करणे हाच पर्याय राहतो. 

भराव वाहिल्यामुळे घाटात भेगा 
घाट परिसरात रस्ता तयार करताना काही भागात दगड कटींग केले जातात, तर काही ठिकाणी भराव टाकला जातो. भरावाकडील बाजूची माती वाहून गेल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. आंबा घाटातील भेगांना हे कारण असावे अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

जिल्ह्यात भेगा पडलेल्या बहुतांश ठिकाणांची पाहणी केली आहे. प्रमाणापेक्षा अधिक पाऊस हेच यामागचे कारण आहे. भूस्तरीय रचनेवर पाण्याचा झालेला परिणामातून अशा घटना घडतात. 
- रश्‍मी कदम,
भूगर्भ तज्ज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com