राज्यात पुन्हा एकदा हाय व्होलटेज; तळ कोकणातल्या राजकारणावर प्रभाव

शिवप्रसाद देसाई | Tuesday, 27 October 2020

ही खुन्नस पुढच्या पिढीपर्यंत चालणार असल्याचे यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. याचा प्रभाव अर्थातच तळकोकणच्या राजकारणावर राहणार आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : राणे-ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या थेट टीकेने पुन्हा एकदा जुन्या जखमेवरची खपली निघाली आहे. ही खुन्नस पुढच्या पिढीपर्यंत चालणार असल्याचे यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. याचा प्रभाव अर्थातच तळकोकणच्या राजकारणावर राहणार आहे.

राणे-शिवसेना वाद गेली १६ वर्षे राज्याच्या राजकारणात घोंगावत आहे. खर तर हा वाद राणे-शिवसेना नव्हे तर नारायण राणे-उध्दव ठाकरे असाच राहिला आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करून शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये सामील झाले तेव्हा राणेंची तळकोकणात मजबूत संघटनात्मक ताकद होती. तेव्हा राणेंनी मालवणमधून लढलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या बड्या नेत्यांना त्या काळात प्राचारासाठी फिरणेही मुश्‍कील झाले होते.

स्वतः शिवसेनाप्रमुखांची मालवणात सभा होऊनही शिवसेना उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले होते. या काळात स्वतः शिवसेनाप्रमुखांसह शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी राणेंवर जहरी टीका केली. राणेंनीही शिवसेनाप्रमुख वगळता इतरांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले. पुढे शिवसेनेने मात्र आपली राणेंबाबतची टीकेची पॉलीसी बदलल्याचे दिसते. त्यांच्या टीकेला स्वतः उध्दव ठाकरे यांनी फारसे उत्तर देणे वेळोवेळी टाळले; मात्र दोघातली खुन्नस कायम राहिली.

तळकोकण अर्थात सिंधुदुर्गात असलेली राजकीय ताकद हे राणेंचे बलस्थान होते. तिथे उद्धव यांनी संघटनात्मक बदल करत शिवसेना सचिव विनायक राऊत यांना जबाबदारी देण्यात आली. हळूहळू राणेंच्या एक एका सत्तास्थानाला धक्‍का देत शिवसेनेने सिंधुदुर्गात पसारा वाढवला. आता शिवसेनेकडे सिंधुदुर्गातील तीनपैकी दोन विधानसभा आणि लोकसभेची जागा आहे. लगतच्या रत्नागिरीत शिवसेनेचा एकहाती अंमल आहे; मात्र सिंधुदुर्गातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र राणेंचा बोलबाला आहे.

इतकेच नाही तर गेल्या १६ वर्षांत पडद्यामागच्या राजकीय चढाओढीतही राणे-ठाकरे खुन्नस पाहायला मिळाली. राणेंच्या रखडलेल्या भाजप प्रवेशामागेही शिवसेना हे एक कारण होतेच.
आता हा संघर्ष पुढच्या पिढीपर्यंत पोहोचल्याचे गेल्या दोन दिवसांतील घडामोडीनंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राणेंनी आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात आणले. याची सुरवात आधीपासून झाली. यातील डॉ. नीलेश यांच्या लोकसभेच्या दुसऱ्या अणि तिसऱ्या निवडणुकीतील पराभवाला विनायक राऊत पर्यायाने उद्धव ठाकरे कारणीभूत होते.

दुसरे पुत्र नीतेश यांच्या दुसऱ्या इनिंगवेळीही शिवसेनेने युती असूनही भाजपच्या विरोधात उमेदवार दिला होता; पण या प्रवासात उध्दव ठाकरेंच्या टीकेचा रोख नारायण राणेंवर असायचा. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून मात्र डॉ. नीलेश आणि नितेश या दोन्ही राणे पुत्रांनी त्यांच्यावर थेट टीकासत्र सुरू ठेवले आहे. सुशांतसिंग रजपूत प्रकरणात तर आदित्य ठाकरेंवर थेट निशाना साधत स्वतः राणेंसह नितेश आणि नीलेश यांनी टीका केली होती. उध्दव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंनी मात्र प्रत्युत्तर टाळले होते.

दसरा मेळाव्याला मात्र ठाकरे यांनी राणेंचा बेडूक असा उल्लेख करत बेडकाची पिल्ले अशी राणे बंधूंवर टीका केली. यानंतर पुन्हा राणे-ठाकरे थेट संघर्ष पुढे आला. आज दोन्ही राणे बंधूंनी ट्विटद्वारे आणि राणेंनी पत्रकार परिषदेतून उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर थेट टीका केली. सोळा वर्षे जुन्या जखमेवरची खपली यामुळे पुन्हा उचलली गेली. याचा प्रभाव तळकोकणच्या राजकारणावर दिसण्याची शक्‍यता आहे. येत्या काळात येथे ग्रामपंचायती, जिल्हा बॅंक, काही नगरपंचायती यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आता राणे भाजपमध्ये आहेत. त्यामुळे या लढतींमध्ये वर्चस्वासाठीच्या लढाईत ही खुन्नस आणखी उफाळून येण्याची शक्‍यता आहे. संघटनात्मक व्यूहरचना ही राणेंच्या साम्राज्याची ताकद आहे.

भावनिक राजकारण आणि ॲन्टी राणे मते हे शिवसेनेच्या यशाचे गमक आहे. आता राणेंसाठी भाजपची मते प्लस असणार आहेत. महाविकास आघाडीमुळे शिवसेनेला दोन्ही काँग्रेसची साथ घेण्याचा पर्याय खुला असणार आहे, असे असले तरी राजकीय संख्यात्मकदृष्ट्या अत्यंत कमी क्षमतेचा, अवघ्या तीन विधानसभा आणि अर्ध्या लोकसभेच्या जागा असलेला सिंधुदुर्ग या संघर्षामुळे राज्यात पुन्हा एकदा ‘हाय होल्टेज’ ठरणार आहे. यात राणे-ठाकरेपेक्षाही पुढची पिढी जास्त सक्रिय असण्याची शक्‍यता आहे.

"आम्ही फावड्याचे असे केले हाल, एक पोर झाला पेंग्विन आणि दुसरा जंगलातील पाल. दुसऱ्यांची ‘पिल्ल’ वाईट, मग यांनी काय त्या DINO च्या खुशीत नशा करून मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातला आहे का? इतकी खुमखुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पुलिसवर कुठलाही दबाव न टाकता नि:पक्षपाती चौकशी करून द्या. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते."

- नितेश राणे

 

संपादन - स्नेहल कदम