रिकामी बाटली द्या; एक रुपया घ्या!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

महाड - प्लॅस्टिक प्रदूषणाच्या विळख्यापासून किल्ले रायगडाला मुक्त करण्यासाठी ‘रायगड रोपे-वे कंपनी’तर्फे या संपूर्ण पर्यटन हंगामात ‘रिकामी प्लॅस्टिक बाटली द्या आणि बदल्यात एक रुपया घ्या’ अशी योजना राबवली जात आहे.

महाड - प्लॅस्टिक प्रदूषणाच्या विळख्यापासून किल्ले रायगडाला मुक्त करण्यासाठी ‘रायगड रोपे-वे कंपनी’तर्फे या संपूर्ण पर्यटन हंगामात ‘रिकामी प्लॅस्टिक बाटली द्या आणि बदल्यात एक रुपया घ्या’ अशी योजना राबवली जात आहे.

किल्ले रायगडावर दररोज येणाऱ्या हजारो पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा गडावर टाकला जातो. यात रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्यांचे प्रमाण अधिक असते. रायगड रोप-वे कंपनीतर्फे २६ ते ३१ मार्च या दरम्यान ‘निसर्गावर प्रेम करा सप्ताह’ घेतला जात आहे. त्याला जोडूनच प्लॅस्टिक बाटल्यांना आळा घातला जात आहे. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या रायगडावर वर्षभरात लाखो पर्यटक येत असतात. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या, रॅपर, पाण्याच्या बाटल्या फेकून देण्यात येत असल्याने हा कचरा गडावर पसरतो. प्लॅस्टिक प्रदूषणामुळे गडाचे सौंदर्य व पुरातन वास्तूंना, तसेच निसर्गसौंदर्याला धोका निर्माण होत आहे. स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था यांच्याकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येते; पण तिला मर्यादा असल्याने हे प्रदूषण नियंत्रणात राहिलेले नाही. रोप-वे कंपनी पर्यटकांनी गडावरून आणलेल्या रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या जमा करून घेत आहे. त्या बदल्यात बाटलीमागे एक रुपया देत आहे. 

पर्यटकांचा चांगला प्रतिसाद
रायगडावर आलेले पर्यटक प्लॅस्टिकची बाटली गडावर फेकून देण्याऐवजी रोप-वे कंपनीकडे जमा करून एक रुपया मिळवत आहेत. दररोज शेकडो बाटल्या रोप-वेच्या लोअर स्टेशनला जमा होत आहेत. या बाटल्या प्रक्रियेसाठी पुढे पाठविल्या जातात. या उपक्रमाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रोप-वेचे व्यवस्थापक राजेंद्र खातू यांनी दिली.

Web Title: Leave empty bottle; Take a rupaya plan