निदान मृतदेह तरी ताब्यात द्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

महाड - महाड दुर्घटना होऊन सात दिवस लोटले तरी आमच्या माणसांचा शोध लागलेला नाही. जिवंत नाही तर मृतदेह तरी ताब्यात द्या, अशा शब्दांत मृतांच्या नातेवाइकांच्या भावनांचा कडेलोट झाला. "एनडीआरएफ‘, नौदल, तटरक्षक दलाला मृतदेह शोधण्यात अपयश येत असेल तर मनुष्यबळ वाढवा, अशी आर्त विनवणी करत नातेवाइकांनी आपत्कालीन यंत्रणेवर खापर फोडले. 

महाड - महाड दुर्घटना होऊन सात दिवस लोटले तरी आमच्या माणसांचा शोध लागलेला नाही. जिवंत नाही तर मृतदेह तरी ताब्यात द्या, अशा शब्दांत मृतांच्या नातेवाइकांच्या भावनांचा कडेलोट झाला. "एनडीआरएफ‘, नौदल, तटरक्षक दलाला मृतदेह शोधण्यात अपयश येत असेल तर मनुष्यबळ वाढवा, अशी आर्त विनवणी करत नातेवाइकांनी आपत्कालीन यंत्रणेवर खापर फोडले. 

या दुर्घटनेतील पंधरा जण अजूनही बेपत्ता आहेत. आज दिवसभरात एकही मृतदेह हाती लागू शकला नाही. त्यांचा तपास केव्हा लागेल याकडे नातलग डोळे लावून बसले आहेत. आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे, असे सांगण्यात येत असले तरी, ठोस काही होत नाही असे का, असा सवालही आपद्‌ग्रस्तांनी केला. 

बेपत्ता असलेल्यांचे नातेवाईक आपत्कालीन निवारण कक्षात आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत होते. त्याचवेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप हे तेथे आले. त्या वेळी सात दिवसांपासून आपत्कालीन निवारण कक्षात असलेल्या नातेवाइकांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. "गेले काही दिवस आम्ही इथे आहोत, युद्धपातळीवर शोध कार्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रशासनाकडून सांगितले जाते. मग बेपत्ता मृतदेह का सापडत नाहीत,‘ असा सवाल प्रमोद सुर्वे यांनी केला. राज्य सरकारला याबाबत अपयश येत असेल, तर विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काहीतरी करा, अशी विनवणी आपद्‌ग्रस्तांनी केली. आम्ही आमच्या घरी असणाऱ्या आणि आमची वाट पाहणाऱ्या घरच्यांना सांगायचे तरी काय, असा सवाल करत दोन दिवसांनी दहावा येईल, बाराव्याचे कार्य तरी कसे करणार आणि का करणार, या प्रश्नाने सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

शोधकार्यातील कर्मचाऱ्यांचेही हाल
शोधकार्यातील कर्मचारी आपापल्या परीने काम करीत आहेत. त्यांची चांगली व्यवस्था ठेवली जात नाही. अथक काम केल्याने त्यांचे पाय सुजले आहेत. थकलेल्या यंत्रणेच्या जागी केंद्रीय स्तरावरून आणखी मनुष्यबळ वाढवावे, अशी मागणी आपद्‌ग्रस्तांनी केली. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे आश्वासन माणिकराव ठाकरे यांनी दिले.

Web Title: Leave at least possess the bodies