एलईडी मासेमारीने हर्णे येथे मत्स्योत्पादनात प्रचंड घट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

एक नजर

  • संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या एलईडी फिशिंगच्या मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात मोठ्या प्रमाणात घट.
  • या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांमध्ये प्रचंड अस्वस्थता.  
  • मत्स्य दुष्काळामुळे मासेमारी बंद करून नौका किनाऱ्यावर घ्यायला सुरवात. 

हर्णे - संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या एलईडी फिशिंगच्या मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मत्स्य दुष्काळामुळे मासेमारी बंद करून नौका किनाऱ्यावर घ्यायला सुरवात झाली. त्यामुळे यावर्षी लाखोंचा तोटा सहन करून पुढीलवर्षी या उद्योगात उतरायचे का नाही याचाच विचार मच्छीमार करत आहेत.

1 ऑगस्ट 2018 पासून सुरू झालेला हंगाम सुरवातीपासूनच संकटात आहे. एलईडी फिशिंगला कोणाकडूनच पायबंद बसत नाही. पारंपरिक मच्छीमारांकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. लोकसभा निवडणुकीवेळी मच्छीमारांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन बंदीचे आदेश देण्यास सांगितले. त्यावेळी एलईडी मासेमारी तात्पुरती बंद ठेवली. पण नंतर पुन्हा मासेमारी सुरू झाली. या नौका सुमारे 40 ते 70 नौटिकल मैल अंतरावर मासेमारी करतात. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना मासळी मिळत नाही, असे मच्छीमारांनी सांगितले. 

हंगामात हीच परिस्थिती हर्णे बंदरातील नौका मालकांवर आली आहे. एका नौकेवर आठ किंवा चार दिवसांकरिता फिशिंग करिता लागणारे साहित्य, नोकर यांचा लाखो रुपयांचा खर्च नौकामालकाच्या अंगावरच पडत आहे. त्यामुळे या उद्योगात मच्छीमारांना ठामपणे उभे राहणे कठीण झाले आहे. खर्च सोसण्यापेक्षा शिमगोत्सवापूर्वीच नौका किनाऱ्यावर काढण्याचे काम सुरू केले. या नौका हर्णै बंदर, पाजपंढरी बंदर येथे शाकारण्याचे काम सुरू आहे. 

जयगड, दिघी खाडीचा आधार

गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी किमान 150 ते 200 नौका दोन महिन्यांच्या विसाव्याला जयगड खाडीचा आधार घेणार आहेत, तर काही आंजर्ले तसेच दिघी खाडीचा आधार घेणार आहेत, असे येथील मच्छीमार बांधवानी सांगितले.

एप्रिल 2019 मध्ये सरकारकडून या अवैध फिशिंगविरोधात बंदीचे आदेश देण्यात आले. त्याप्रमाणे मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे सचिव अनुपकुमार आणि रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त पालव आणि मच्छीमारांची बैठक झाली. त्यामध्ये एलईडी फिशिंग 30 एप्रिलपर्यंत पूर्ण बंद झाली पाहिजे, असे आदेश देण्यात आले. परंतु तरीही मासेमारी सुरू आहे. त्यामुळे मच्छीमारांनी नौका किनाऱ्यावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्रालयाने एलईडी मासेमारी लवकर बंद करावी, असे मच्छीमार यशवंत खोपटकर यांनी सांगितले.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी 50 टक्केही मासळी मिळत नाही. हर्णै बंदरात गेल्यावर्षीपर्यंत सायंकाळी चार ते आठ वाजेपर्यंत मासळीची लिलावप्रक्रिया होत होती. यावर्षी हाच लिलाव सायंकाळी चार वाजता सुरू होऊन दीड ते दोन तासात संपतो.

- अस्लम अकबानी, मच्छी व्यावसायिक, हर्णे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LED fishing affects fish production in Harne