`याची` एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

सुरूवातीला अधून-मधून क्वचितच होणारे बिबट्याचे दर्शन पंधरा दिवसांपासून मंदिराकडून जाणाऱ्या रस्त्याच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या कपारीवर हमखासच होवू लागले.

आचरा (सिंधुदुर्ग) - तोंडवळी येथे पंधरा दिवसांपासून डोंगराच्या कड्यावर येऊन दर्शन देणारा बिबट्या चर्चेचा विषय बनला आहे. या कड्यासमोरच्या रस्त्यावर संध्याकाळी पाच पासूनच बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांच्या होणाऱ्या गर्दीचा बिबट्यावर कोणताही परिणाम होत नसल्याने ग्रामस्थही बिबट्याला पाहण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. ग्रामदैवतच वाघेश्‍वर असलेल्या या तोंडवळीत संध्याकाळी होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनाला वेगळंच महत्त्व प्राप्त झाले आहे. 

कोरोनामुळे संचारबंदी सुरू झाली आणि वाहतूक बंद झाली. त्यामुळे सर्वत्र निर्माण झालेल्या शांततेत वन्य प्राणी, पशु पक्षांचा मुक्तपणे संचार वाढला. घराच्या टेरेसवरही बिबट्याचे दर्शन होण्याचा प्रकार वायंगणी येथे घडला होता. त्यानंतर मालवण तालुक्‍यातील तोंडवळी येथील वाघेश्वर मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगरावर बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होवू लागले.

सुरूवातीला अधून-मधून क्वचितच होणारे बिबट्याचे दर्शन पंधरा दिवसांपासून मंदिराकडून जाणाऱ्या रस्त्याच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या कपारीवर हमखासच होवू लागले. त्यामुळे या रस्त्यावर संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत आहे. पंधरा दिवसांहून अधिक काळ या भागात बिबट्या असूनही माळरानावर मोकळी सोडलेल्या गुरांना किंवा पाळीव जनावरांनाही या बिबट्याने कोणतीही इजा पोहोचवली नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. रोज सायंकाळी किंवा एक दिवसाआड बिबट्याचे होणारे दर्शन हा तोंडवळी ग्रामस्थांचा चर्चेचा विषय ठरला आहे. 

अनेकदा दर्शन 
या गावचे ग्रामदैवत वाघेश्‍वर असल्याने या मंदिरामागे असलेल्या जंगलात बिबट्याच्या होणाऱ्या दर्शनाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. याबाबत येथील ग्रामस्थ पाटील सांगतात या अगोदरही या जंगलात बिबट्या दिसत असे. रानात चरावयास सोडलेल्या पाळीव जनावरांमध्ये फिरताना तर रात्री गोठ्यात बांधलेल्या गुरांमध्येही बसलेला आढळला आहे. तर सरपंच आबा कांदळकर यांच्या मते सदर बिबट्या मादी असून तिची पिल्लेही असल्याने ती या भागात रमली असण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard appeared tondavali kokan sindhudurg