संगमेश्वर तालुक्यातील हेदलीत मिळाला बिबट्याचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

संगमेश्‍वर - तालुक्‍यातील हेदली गावात बिबट्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.  

संगमेश्‍वर - तालुक्‍यातील हेदली गावात बिबट्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.  

हेदली गावचे पोलिसपाटील नरेंद्र खानविलकर आणि ग्रामस्थ फत्तेसिंग इंदुलकर हे सोमवारी संध्याकाळी गाव मंदिरात गेले होते. त्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी शोध घेतला असता गाव देवळासमोर रस्त्यापासून सुमारे दीडशे फुटावर भात शेताच्या मळीत एक बिबट्या सडलेल्या अवस्थेत आढळला.

पोलिसपाटील खानविलकर यांनी याची खबर या भागाचे वनपाल सुरेश उपरे यांना दिली. यानंतर वनपाल उपरे यांच्यासोबत वनरक्षक नानू गावडे, आनंद धोत्रे व सागर गोसावी घटनास्थळी दाखल झाले. या गोष्टीला रात्री उशीर झाल्याने वरिष्ठांच्या सल्ल्याने वनपाल यांनी याचा वैद्यकीय तपास करण्याचे ठरविले. 

आज सकाळी देवरूखहून पशुवैद्यकीय अधिकारी गणेश मेश्राम, वनरक्षक, ग्रामस्थ सुनील इंदुलकर, प्रमोद इंदुलकर, फत्तेसिंग इंदुलकर, पो.पा. खानविलकर आदींच्या उपस्थितीत बिबट्याची तपासणी केली असता मृत बिबट्याचे सारे अवयव जाग्यावर सापडले. त्याची कातडी सडलेली होती. उपस्थितांच्या समक्ष पंचनामा केला. बिबट्याचा मृत्यू  साधारणतः पाच ते सहा दिवसापूर्वी झाला असून तो  नैसर्गिक मृत्यू असल्याचे पशू वैद्यकीय अधिकारी मेश्राम यांनी जाहीर केले. बिबट्याला जागेवरच अग्नी देण्यात आला.

Web Title: Leopard dead body found in Hedali Ratnagiri