रत्नागिरी जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने बिबट्या ठार 

संदेश सप्रे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

एक नजर

  • भक्ष्याचा पाठलाग करत बिबट्या चक्‍क चढला विजेच्या खांबावर.
  • संगमेश्‍वरजवळच्या असुर्डे डांगेवाडीत घटना. 
  • भारीत तारांचा डोक्‍याला जोरदार धक्‍का लागल्याने बिबट्याजागीच ठार.  

संगमेश्‍वर - आजपर्यंत भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याचे, कुणाच्या घरात घुसल्याचे प्रकार घडत होते. मात्र विजेच्या खांबावर चढलेला बिबट्या पाहिला नव्हता. संगमेश्‍वरजवळच्या असुर्डे डांगेवाडीत अशी घटना पाहायला मिळाला. भक्ष्याचा पाठलाग करत बिबट्या चक्‍क विजेच्या खांबावर चढला. भारीत तारांचा त्याच्या डोक्‍याला जोरदार धक्‍का लागल्याने तो ठार झाला. 

हा प्रकार मंगळवारी पहाटे घडला. याबाबत वनपाल सुरेश उपरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री भक्ष्याच्या शोधार्थ फिरणाऱ्या बिबट्याला मांजर दिसले. त्याने मांजराचा पाठलाग सुरू केला. जिवाच्या आकांताने धावणारे मांजर विजेच्या खांबावर चढले. मांजरापाठोपाठ डरकाळ्या फोडत बिबट्याही त्या खांबावर 22 फूट उंच चढला पण भक्ष सुटले. खांबावरून खाली येताना त्याच्या डोक्‍याला विजेचा जोरदार धक्‍का बसला आणि खाली पडून तो गतप्राण झाला. 

उजाडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी या बिबट्याला पाहिले. बिबट्या मृत असल्याचे लक्षात येताच असुर्डे पोलिस पाटील सुभाष गुरव यांनी तत्काळ वनविभागाला याची खबर दिली. परिक्षेत्र वनाधिकारी रमेश कांबळे, तालुका वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक सागर गोसावी, एन. एस. गावडे, एस. जी. कदम घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन केले. डोक्‍याला विजेचा धक्‍का लागून तो मृत्युमुखी पडल्याचे निष्पन्न झाले. पुढील सोपस्कार पूर्ण करून त्या बिबट्यावर ग्रामस्थांच्या उपस्थित घटनास्थळी अंत्यसंस्कार केले. बिबट्याची मादी 3 वर्षांचा असल्याची माहिती वनपालांनी दिली. 

विभागात धुमाकूळ 
गेले काही महिने या बिबट्याने असुर्डे, नावडी, माभळे विभागात धुमाकूळ घातला होता. भटकी कुत्री, पाळीव कोंबड्यांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढले होते. माभळेत काही दिवसांपूर्वी मुख्य रस्त्यावर वाहनचालकांनी या बिबट्याने दर्शन दिले होते. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते. या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत असतानाच आज पहाटे हा प्रकार घडला. 

केस चिकटलेले आढळले 
ज्या खांबावर बिबट्या चढला त्या ठिकाणी त्याचे केस चिकटलेले आढळून आले. तसेच नखांनी खरवडेला भाग स्पष्ट दिसून येतो.ज्या तारेला बिबट्या चिकटला त्या ठिकाणी डोक्‍याची भिस लागलेली होती.यावरून तो बिबट्या खांबावर चढला असावा,अशी शक्‍यता वनविभागाकडून वर्तवली आहे. 

ही अशी पहिलीच घटना आहे. बिबट्या सुमारे 22 फुटाच्या सिमेंट खांबावर चढल्याचे पुरावे दिसत आहेत. नख्यांचे व्रण होते, ज्या ठिकाणी विजेचा धक्का बसला त्या ठिकाणी बिबट्याचे केस चिकटले आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले. बिबट्या खांबावर चढल्याचे पुरावेच आम्हाला मिळाले. मांजराचा पाठलाग करताना तो वर चढला असावा. 

- सुरेश उपळे, संगमेश्‍वर वनपाल 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard dead due to electric shock in Ratnagiri District