रेल्वेच्या धडकेने बिबट्या ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

पाणवठ्यावर येत असल्याचा अंदाज
पोमेंडी भागात एका ठिकाणी पाणवठा आहे. अनेक वन्य प्राणी तेथे पाणी पिण्यासाठी येतात. हा बिबट्यादेखील पाणी पिण्यासाठी येत असावा; मात्र रेल्वे रूळ ओलांडताना त्याचा अंदाज चुकल्याने तो रेल्वेच्या धडकेने ठार झाला असावा, असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी : तालुक्‍यातील पोमेंडी येथे कोकण रेल्वेच्या जोरदार धडकेत बिबट्या ठार झाला. बिबट्या सुमारे 60 मीटर रेल्वेबरोबर फरफटत गेल्याने त्याचे दोन तुकडे झाले. लाइनमनला रेल्वे रुळावर मांस दिसल्यानंतर त्यांनी शोध घेतला, तेव्हा हा प्रकार उघड झाला. तो तीन वर्षांचा नर होता. वन विभागाने बिबट्याचे तुकडे गोळा करून जाळून नष्ट केले.

शनिवारी (ता. 5) रात्री एकच्या सुमारास रेल्वे लाइनमन श्री. सुर्वे यांच्या हा प्रकार लक्षात आला. पोमेंडी ब्रिजच्या दरम्यान ते गस्त घालत होते तेव्हा त्यांना रेल्वे रुळाला काही ठिकाणी मांस लागलेले दिसले. त्या दिशेने जात असता बिबट्याची शेपटी, त्याचा अर्धा भाग असे ठिकठिकाणी तुकडे आणि मांस आढळून आले. त्यांनी लगेच नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. वन विभागाला याची माहिती देण्यात आली. रत्नागिरी विभागाचे वन अधिकारी बी. आर. पाटील, वनपाल एल. बी. गुरव, वनरक्षक एन. एच. गावडे, श्री. डोईफोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

रेल्वेच्या धडकेने झालेले बिबट्याचे तुकडे ठिकठिकाणी पडले होते. तोंड आणि खांद्याचा भाग सोलून निघाला होता. तेथूनच शरीराचे दोन तुकडे झाले होते. शेपटीही तुटून पडली होती. वन विभागाने गोणपाटात तुकडे भरून दहन करून नष्ट केले. रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बिबट्यांचा अधिवास धोक्‍यात आल्यामुळे मानवी वस्तीमध्ये त्यांचा संचार वाढतो आहे आणि त्यामुळे वाहनांना किंवा रेल्वेला धडकून बिबट्याचा मृत्यू ओढवत आहे. कालच (ता. 5) संगमेश्‍वर तालुक्‍यातील कुंभारखाणी येथे शौचालयात रात्रभर बिबट्या अडकला. सुदैवाने तो पिंजऱ्यात जेरबंद करता आला.

Web Title: leopard dies below train