कुडाळात बिबट्याची शिकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

कुडाळ - शहरातील स्वामी समर्थनगर येथे दोन ते तीन वर्षांच्या बिबट्याची गोळी घालून शिकार केल्याचा धक्‍कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघड झाला. यासाठी बंदुकीचा वापर करण्यात आला. भर शहरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. 

कुडाळ - शहरातील स्वामी समर्थनगर येथे दोन ते तीन वर्षांच्या बिबट्याची गोळी घालून शिकार केल्याचा धक्‍कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघड झाला. यासाठी बंदुकीचा वापर करण्यात आला. भर शहरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. 

स्वामी समर्थनगर येथे पहाटेच्या सुमारास विलास तेली यांना त्यांच्या जागेत मृतावस्थेत बिबट्याची मादी दिसून आली. त्यांनी जिल्हा पोलिस यंत्रणेला कळवले. ओरोस पोलिसांनी तत्काळ कुडाळ पोलिस ठाण्याला कळवल्यानंतर घटनास्थळी कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्यासह पोलिस पथक पोहोचले. 

वन विभागालाही कळवण्यात आले. घटनास्थळी वनक्षेत्रपाल प्रदीप कोकितकर, अमोल चिरमये, अमृत शिंदे, वनपाल विनोद मयेकर, वनरक्षक सूर्यकांत सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. बिबट्याची मादी दोन ते अडीच वर्षांची असून, बंदुकीची गोळी लागून मृत झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले.

याबाबत वनक्षेत्रपाल कोकितकर म्हणाले, ‘‘अज्ञात शिकाऱ्याने बंदुकीच्या साहाय्याने या बिबट्याची शिकार पहाटेच्या सुमारास केली असावी. घायाळ झाल्याने ती घटनास्थळापासून रस्त्याच्या ठिकाणी आली व मृत झाली असावी. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. काडतुसच्या बंदुकीच्या साहाय्याने अज्ञात शिकाऱ्याने या बिबट्याची शिकार केली आहे. शिकाऱ्याने अगदी जवळून एकाच गोळीत या बिबट्याची शिकार केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होते. बिबट्याच्या शरीरात गोळीचे काही अवशेष सापडले असून, ते पुढील तपासणीसाठी कलिना (मुंबई) येथे पाठवण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल सोमवारपर्यंत मिळेल. या घटनेचा तपास आम्ही सुरू केला असून, त्या भागांमध्ये ज्यांच्याकडे परवाना असलेल्या बंदुका आहे, त्यानुसार आम्ही तपास करू.’’

या बिबट्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय विभागात डॉ. सचिन गालवडकर यांनी केले. प्रशासकीय जागेत या बिबट्याचे दहन करण्यात आले.’’ श्री. कोकितकर या प्रकाराचा तपास करीत आहेत. 

गोळी पोटातून बाहेर!
तपास अधिकारी कोकितकर यांनी सांगितले, की शिकाऱ्याने बिबट्याचे कोणतेही अवयव चोरून नेले नाहीत. गोळी नाकापासून घुसून तोंड छातीपासून पुढे जाऊन पोटातून बाहेर पडली आहे. एकाच गोळीने शिकार केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard hunting in Kudal