बिबट्याला जेरबंद करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

खेड - खेड-आष्टी मार्गावरील बोरज धरणाशेजारी भर दिवसा बिबट्याने दुचाकीस्वारावर हल्ला करून त्याला जखमी केल्याने या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दुचाकीस्वाराच्या पाठीवर अडकवलेल्या बॅगमुळे त्यांच्या प्राणावर बेतलेले जखमी होण्यावर निभावले.

या रस्त्यावरील गेल्या आठवड्याभरातील बिबट्याने हल्ला करण्याची ही तिसरी घटना असल्याने या परिसरातील नागरिक घराबाहेर पडण्यासही घाबरू लागले आहेत. दिवसा ढवळ्या दुचाकीस्वारांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त केला नाही तर नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

घटनास्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शिव सुतारवाडी येथील रघुनाथ नरळकर व वासुदेव नरळकर हे दोघेजण दुचाकीवरून खेड येथे आले होते. खेड येथील कामे उरकून ते दुचाकीने परत निघाले असताना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास खेड-आष्टी मार्गावरील बोरज धरण येथे झाडीत लपून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर अचानक झडप घातली. अचानक झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे दुचाकीस्वार रघुनाथ यांचा दुचाकीवरील ताबा सुटला; परंतु प्रसंगावधान राखून दुचाकी पळवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यामुळे चिडलेल्या त्या बिबट्याने दुचाकीचा पाठलाग करून काही अंतरावर दुचाकीच्या मागे बसलेले ५० वर्षीय वासुदेव नरळकर यांच्यावर मागून हल्ला चढवला.

नरळकर यांच्या पाठीवर असलेल्या बॅगमुळे ते या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले; मात्र वाघाने मारलेल्या पंज्यांमुळे पाठीवरील बॅग तुटून वाघाच्या पंज्यांची तीन नखे त्यांच्या पाठीत घुसली. प्रसंग जीवघेणा असल्याचे लक्षात आल्याने दुचाकीस्वार रघुनाथ यांनी दुचाकी न थांबवता वेगात पळवता येईल तितक्‍या वेगाने दुचाकी पळवली. त्याच वेळी या दोघांनीही जोरात आरडाओरडा करायला सुरवात केल्याने सुमारे अर्धा किलोमीटर पाठलाग करणाऱ्या बिबट्याने जंगलात पलायन केले.

शनिवारी रात्रीही याच रस्त्यावर बिबट्याने दुसऱ्या एका दुचाकीस्वारावर हल्ला केला होता. याही हल्ल्यात शिव बुद्रुक गावडेवाडी येथील राईन नामक या दुचाकीस्वारावरील बिबट्याची झडप चुकली; परंतु ते दुचाकीवरून पडल्याने त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच परिसरात बिबट्याने केलेला हल्ला हा आठवड्याभरातील तिसरा हल्ला आहे. 

या परिसरात दिवसा दिसणाऱ्या बिबट्याच्या बंदोबस्ताबाबत ग्रामस्थ गेली दोन वर्षे वन विभागाकडे मागणी करत आहेत. वन विभागाच्यावतीने या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजराही लावण्यात आला होता; मात्र त्याचा उपयोग न झाल्याने, परिसरातील नागरिक गेली दोन वर्षे बिबट्याच्या दहशतीखालीच वावरत आहेत. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले वासुदेव नरळकर यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: leopard in khed