बिबट्याचे कातडे बाळगल्या प्रकरणी आठजण कणकवली तालुक्यात ताब्यात

तुषार सावंत
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

कणकवली - हुंबरट येथे बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या देवगड येथील आठ जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. संशयितांकडून बिबट्याची दोन कातडे व अन्य साहित्य असा एकूण १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिली.

कणकवली - हुंबरट येथे बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या देवगड येथील आठ जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. संशयितांकडून बिबट्याची दोन कातडी अन्य साहित्य असा एकूण १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिली.

कणकवली तालुक्यातील हुंबरट येथे काही लोक वन्य प्राण्यांचे कातड़े विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांना ताब्यात घेण्याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संबंधितांना जेरबंद करण्यासाठी कणकवली हुंबरठ तिठा येथे नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी करण्यात सुरुवात केली होती.

दरम्यान कणकवलीहुन हुंबरठच्या दिशेने येणारी टाटा सुमो (एमएच ०४ डीएन ५०९४) ही गाडी तपासणीकरिता थांबविण्यात आली. या गाडीची तपासणी करत असताना ड्रायव्हर शेजारी असलेली अमेरिकन टूरिस्टर बॅग तपासली असता त्यात एका बिबट्याचे कातडे आढळून आले. तसेच वाहनात मागे बसलेल्या व्यक्तींच्या पायाखाली असलेल्या प्लास्टिक कागदामध्ये बिबट्याचे एक ताजे कातडे मिळाले. या प्रकरणी देवगडमधील ८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून बिबट्याच्या दोन कातड्यांसह सुमारे १९ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

कातड्यांसह १९ लाखाचा मुद्देमाल जप्त

सुमारे ८ लाख किमतीचे व ५ लाख किमतीचे बिबटयाचे कातडे जप्त करण्यात आले.. तसेच ४ लाख किमतीची टाटा सूमो व इतर साहित्य असा एकूण १९ लाखाचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस, पोलीस नाईक कृष्णा केसरकर, सदानंद राणे, रवि इंगळे, संकेत खाडे, अमित तेली यांनी केली.

Web Title: Leopard Leather sellers arrested in Kankavali Taluka