मंडणगडमध्ये पुन्हा बिबट्याचे दर्शन

मंडणगडमध्ये पुन्हा बिबट्याचे दर्शन

मंडणगड- मंडणगड तालुक्‍यातील तळेघर येथे गोठ्यात माळ्यावर बसलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी फटाके वाजविल्याबरोबर त्याच्या दुप्पट आवाजात डरकाळी फोडून बिबट्या बाहेर आला. यामुळे ग्रामस्थ व वन विभागाचे कर्मचाऱ्यांची पळता भुई झाली. पळालेला बिबट्या पुन्हा गोठ्याच्या माळ्यावर येऊन बसला. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. दोन दिवसांत तो पिंजऱ्यात मिळालेला नाही; मात्र गावकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. त्यामुळे गाव भयग्रस्त आहे.


तळेघर येथील शेतकरी मंगेश करावडे यांच्या गोठ्यात गुरुवारी (ता. 8) दुपारच्या वेळेत बिबट्याने प्रवेश केला व तो गोठ्याच्या माळ्यावर दबा धरून बसला. त्यामुळे गोठ्यातील गुरे घाबरली आणि स्वतःला दाव्यातून सोडवून पळण्याचा प्रयत्न करू लागली. हा आवाज कानावर आल्याने गोठ्यात काय चालले आहे, हे पाहण्यासाठी मंगेश करावडे यांची आई पार्वती यांनी प्रथम कोनासा घेतला. गुरांचा आवाज कमी होत नसल्याने करावडे यांची पत्नी मोहिनी करावडे यांनी गोठ्याच्या मागील बाजूने पाहण्यास सुरवात केली, त्या वेळी गोठ्याच्या माळ्यावरून जुने भांडे खाली पडले. त्यांची वर नजर गेली अन्‌ बोबडीच बसली. गोठ्याच्या माळ्यावर बसलेला बिबट्या त्यांना दिसला. दोघींनीही गावात याची माहिती दिली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच घबराट पसरली. ग्रामस्थांनी बिबट्या गोठ्यात शिरून माळ्यावर बसल्याची माहिती येथील वन विभागास दिली. यानंतर एक तास बिबट्या गोठ्यातच होता.


वन विभागाचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी हजर झाले. दुपारी तीनच्या सुमारास लपून बसलेल्या बिबट्याला माळ्यावरून बाहेर काढण्यासाठी फटाके वाजवण्यात आले. त्याबरोबर त्याच्या दुप्पट आवाजात बिबट्याने डरकाळी फोडली व गोठ्यातून बाहेर पडला. या वेळी वन विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली. सारे सैरावैरा पळू लागले. यात वन विभागाचे कर्मचारी ढाकणे यांना किरकोळ दुखापत झाली. धावपळीत बिबट्या गायब झाला. थोड्या वेळाने तो पुन्हा गोठ्यात येऊन बसला. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा मागविण्यात आला. तो गावात सायंकाळी साडेसातच्या सुमारास आला. सापळा लावूनही गेल्या दोन दिवसांत बिबट्या सापळ्यात अडकलेला नाही. ग्रामस्थांना ठिकठिकाणी त्याचे दर्शन होत आहे.

सापळा लावून कर्मचारी गायब
सापळा लावल्याला दोन दिवस पूर्ण झाले; मात्र बिबट्याही नाही आणि वन विभागाचे कर्मचारीही गावात फिरकले नाहीत. सापळ्यात कुत्र्याचे पिलू अडकून ठेवण्यात आले होते, त्याची काळजी घेणारे कोणी नसल्याने थंडीने गारठून ते मरू नये, म्हणून ग्रामस्थांनी त्याला सोडून दिले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com