सिंधुदुर्ग जिल्ह्यात `येथे` आहे बिबट्याचा वावर 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

काही दिवसापूर्वी गोवेरी भगतवाडी येथील शेतकरी श्रीधर पालकर यांची शेळी या बिबट्याने वायंगणी परिसरात फस्त केली. शुक्रवारी (ता. 11) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पिंगुळी मुस्लिमवाडी येथील शेतकरी असलम कासम खुल्ली यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ बिबट्या व तिचे बछडे फिरताना दिसले.

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - पिंगुळी, गोवेरी परिसरात बिबट्या आणि त्याचे छोटे बछडे यांचा वावर असल्याने ग्रामस्थांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. वनखात्याने बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली. 

पिंगुळी, गोवेरी ग्रामस्थ यांनी वनविभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेले काही दिवस पिंगुळी व गोवेरीमध्ये भरवस्तीत दिवसाढवळ्या बिबट्या आणि तिचे छोटे बछडे फिरताना दिसले. त्यांच्या या वावरामुळे स्थानिक नगरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाळीव जनावरांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. गुरांना चारा मिळणे कठीण झाले आहे.

काही दिवसापूर्वी गोवेरी भगतवाडी येथील शेतकरी श्रीधर पालकर यांची शेळी या बिबट्याने वायंगणी परिसरात फस्त केली. शुक्रवारी (ता. 11) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पिंगुळी मुस्लिमवाडी येथील शेतकरी असलम कासम खुल्ली यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ बिबट्या व तिचे बछडे फिरताना दिसले.

मनुष्यवस्तीत वावर वाढल्याने ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. परिसरातही त्यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे धोक्‍याचे बनले आहे. तरी या बिबट्याचा व त्याच्या बछड्यांचा वनखात्याने योग्य बंदोबस्त करून शेतकऱ्यांना भयमुक्त करावे, असे निवेदनात म्हटले आहे. 

यावेळी तेंडोली जिल्हा परिषद सदस्य वर्षा कुडाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, बाबल गावडे, दीपक गावडे, राजन सडवेलकर, सत्यवान हरमलकर, सुंदर गावडे, भरत गावडे, राजन पुरलकर, शोएब खुल्ली, वनविभागाचे सुर्यकांत सावंत उपस्थित होते. 

कॅमेरे लावून शोध घेऊ 
या बिबट्याचा व त्याच्या बछड्यांचा या परिसरात कॅमेरे लावून शोध घेतला जाईल, फास टाकता येणार नाही. असे श्री. सावंत यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Seen In Pinguli Goveri In Sindhudurg District