...तर माझी आई वाचली असती ! त्याने लिहले थेट मुख्यमंत्र्यांना पत्र अन्

एकनाथ पवार
Wednesday, 9 September 2020


 आरोग्य व्यवस्थेवर ठेवले बोट

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : आईचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले. तिच्या प्रकृतीत सुधारणा देखील झाली; परंतु अचानक तिचा मृत्यु झाला. ज्यावेळी मी पाहीले त्यावेळी ऑक्सीजन सिलेंडरचा काटा शुन्य होता. वेळीच जर तो सिंलेंडर बदलला असता तर माझ्या आईचा जीव वाचला असता, अशा शब्दात मुलगा अजिंक्य जाधव यांने फेसबुकच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आरोग्य यंत्रणेकडे बोट दाखविताना त्याने राजकीय पदाधिकार्‍यांच्या भुमिकेवर देखील आक्षेप नोंदविला आहे.

अजिंक्यच्या आईचा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनाने मृत्यू झाला. आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्यामुळे आणि वेळेत ऑक्सीजन न मिळाल्यामुळे आपल्या आईचा मृत्यू झाला, असा आक्षेप त्यांनी मुख्यमंत्र्यांना फेसबुकच्या माध्यमातून लिहीलेल्या पत्रात नोंदविला आहे. त्यांनी आपल्याला आलेले अनुभव कथन केले आहेत. आईला दम्याचा त्रास जाणवू लागला म्हणून ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.

परंतु तेथे ऑक्सीजनची व्यवस्था नसल्यामुळे स्वत:च्या गाडीने आम्ही तिला कणकवलीला नेले. तिथे तिचे शरीर ऑक्सीजन घेईना, म्हणून तिला ओरोस जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तेथे तिची प्रकृती स्थिर झाली; परंतु तिला थेट कोविड सेंटरमध्ये दाखल केले. दुसर्‍या दिवशी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तिच्यामध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे नव्हती. दहा दिवसांपूर्वी तिला ताप आला होता; परंतु तिला त्यानंतर कोणताही त्रास झालेला नाही. कोरोना अहवाल आल्यानंतर तिच्यावर कोविडचे उपचार सुरू करण्यात आले. तिची प्रकृती देखील स्थिर झाली होती. परंतु तिला ज्या विभागात नेऊन ठेवले तिथे 30 ते 35 रूग्ण जोखीमीचे होते.

हेही वाचा- सबका टाइम आयेगा  : नितेश राणेंनी डागली शिवसेनेवर तोफ

अनेकांना वेड लागले होते तर काही कोरोनाने मरत होते. ते बघून ती घाबरली कि, काय झाले ते समजले नाही. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. ज्यावेळी तिचा मृत्यू झाला, त्यावेळी ऑक्सीजन सिलेंडरचा काटा शुन्यावर होता. तो सिलेंडर बदलला असता तर कदाचित माझ्या आईचा जीव वाचु शकला असता, अशा शब्दात अजिंक्य याने आरोग्य विभागाची क्षमता, उपचार पध्दती, एकुण कोविड सेंटरमध्ये त्याला आलेला अनुभव पत्रातून कथन केला आहे.

याशिवाय त्याने मुंबईकरांना जिल्ह्यात आणण्यासाठी धडपडणार्‍या राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांच्या भुमिकेला देखील आक्षेप घेतला आहे. याच पत्रात त्याने आपण आणि वडील दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असून आपण सायनमधील डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असून आपली प्रकृती उत्तम असल्याचा उल्लेख केला आहे. या पत्रामुळे खळबळ माजली आहे.

हेही वाचा- धक्कादायक ; अशी काढली पोस्टमास्तरने मृत व्यक्तींच्या खात्यावरील रक्कम -

“ज्या दिवशी हा रूग्ण वैभववाडी ग्रामीण रूग्णालयात आला. त्या रूग्णाची तपासणी केल्यानंतर रूग्णाची स्थिती गंभीर असल्याचे ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांच्या निर्दशनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीने कणकवलीला नेण्याचा सल्ला दिला. ज्या दिवशी रूग्ण आला त्यादिवशी ग्रामीण रूग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये मुबलक प्रमाणात ऑक्सीजन सिंलेडर होते. सिंलेंडरची कमतरता आज देखील नाही. त्यामुळे ऑक्सीजनअभावी उपचार केले नाहीत, असे कुणाचे म्हणणे असेल तर पुर्णतःचुकीचे आहे. याशिवाय कोविड सेंटरमध्ये वेळोवेळी जाऊन रूग्णांची विचारपूस करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.”
 - डॉ. नवनाथ कांबळे, ग्रामीण रूग्णालय, वैभववाडी

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter to CM through Facebook He has also objected to the role of political office-bearers in pointing the finger at the health system