छत्रपतींचा पुतळा ब्राँझचा उभारा - साळगावकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

सावंतवाडी - छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सावंतवाडी शहरात उभारला जाणे ही गौरवाची बाब आहे. मात्र तो पुतळा ब्राँझ धातूचाच असावा, अशी आपली अट राहणार आहे. त्यासाठी संबंधित समितीने आवश्‍यक असलेली जागा सुचवावी, ती देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी भूमिका नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज व्यक्त केली. 

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपतींचा पुतळा उभारणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी स्मारक समिती जाहीर केली आहे. याबाबत नगराध्यक्ष साळगावकर यांनी आपली भूमिका जाहीर केली. ते म्हणाले, ‘‘छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभे राहणे ही शहराच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. संबंधित स्मारक समितीकडून आजअखेर पालिकेकडे कोणतीही लेखी मागणी करण्यात आलेली नाही. तरी त्यांनी आवश्‍यक असलेल्या जागा सुचवाव्यात. त्यासाठी आपण पालिका आणि शासनाकडे नक्कीच प्रयत्न करणार आहे; परंतु हा पुतळा उभारताना तो ब्राँझ धातूचाच असावा, अशी शिवप्रेमी म्हणून आपली अट असणार आहे. पुतळा सिमेंट तसेच अन्य धातूचा उभारण्यात आल्यास काही दिवसांनी त्याला तडे पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे तो पुतळा उभा राहावा, यासाठी संबंधित स्मारक समितीने त्या दृृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे.’’

सद्यःस्थितीत मोती तलावाच्या मध्यभागी हा पुतळा व्हावा, असे काही नागरिकांचे व स्मारक समितीचे म्हणणे आहे. मात्र त्या ठिकाणी पुतळा उभारल्यास किमान तीन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील दीड कोटी रुपये तलावात पाया घालण्यासाठी खर्च होईल. यासाठी आवश्‍यक परवानगी समितीने शासनाकडे मागावी. सहकार्य आम्ही करू.
- बबन साळगावकर, नगराध्यक्ष

Web Title: Lift up a bronze statue of Chhatrapati Shivaji