संगमेश्‍वर शिवसेनेची यादी सोमवारी?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

देवरूख - संगमेश्‍वर तालुक्‍यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती उमेदवारांची पहिली यादी सोमवार (ता. २३) जाहीर होण्याची शक्‍यता आहे. बहुतांश गट- गणांमधील उमेदवार निश्‍चिती झाल्याचे सांगण्यात येत असून, केवळ कसबा आणि कोसुंब गटातील उमेदवारांची नावे ऐनवेळी जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

देवरूख - संगमेश्‍वर तालुक्‍यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती उमेदवारांची पहिली यादी सोमवार (ता. २३) जाहीर होण्याची शक्‍यता आहे. बहुतांश गट- गणांमधील उमेदवार निश्‍चिती झाल्याचे सांगण्यात येत असून, केवळ कसबा आणि कोसुंब गटातील उमेदवारांची नावे ऐनवेळी जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दोन दिवसांपूर्वी संगमेश्‍वरात झाल्या. यावेळी पक्षनिरीक्षकांनीही चाचपणी करून तसा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविला आहे. संगमेश्‍वर तालुक्‍यातील उमेदवारांची जबाबदारी खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार सदानंद चव्हाण, आ. उदय सामंत, आ. राजन साळवी, तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांच्यावर सोपविली आहे. जिल्हा परिषदेसाठी संगमेश्‍वर तालुक्‍यातील धामापूर तर्फे संगमेश्‍वरमधून प्रसिद्ध उद्योगपती आणि तालुका संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, कडवईतून माजी उपसभापती संतोष थेराडे, कसब्यातून माजी जि. प. अध्यक्ष सौ. रचना महाडिक, नावडीतून ज्येष्ठ कार्यकर्त्या माधवी गीते, कोसुंबमधून माजी आमदार सुभाष बने यांचे पुत्र रोहन सुभाष बने, ओझरे खुर्दमधून युवा कार्यकर्ते जनक जागुष्टे यांच्या पत्नी , दाभोळेमधून माजी जि.प. सदस्य व भाजप मधून सेनेत प्रवेशकर्त्या झालेल्या सौ. रजनी चिंगळे यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. यामधील कसबा गटासाठी माजी उपाध्यक्ष राजेश मुकादम यांनी, तर कोसुंब गटासाठी विद्यमान उपसभापती प्रमोद अधटराव, प्रमोद कदम यांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. कोसुंबमधून अन्य तिघेही शर्यतीत आहेत. परिणामी या दोन गटातील उमेदवारांची नावे ऐनवेळी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित गट आणि गणांमधील उमेदवारांची यादी खासदार सोमवारी जाहीर करण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेकडे २१ जागांसाठी ६० पेक्षा अधिक इच्छुक आहेत. यामुळे बंडखोरीचा सर्वाधिक धोका शिवसेनेलाच आहे. 

अन्य इच्छुकांची समजूत काढून मगच उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सेनेकडे गटांप्रमाणेच गणांमध्येही जोरदार चुरस आहे. प्रत्येक जागेसाठी किमान दोघे इच्छुक असल्याने अधिकृत उमेदवारांची नावे निश्‍चित करताना वरिष्ठांना तारेवरची कसरत करावी लागली आहे. यातून कुणाचे नाव जाहीर होणार आणि कुणाचे पत्ते कट होणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: List of Sangameshwar Shiv Sena on Monday